मुंबई : ‘प्ले-ऑफ’मधील उर्वरित एकमेव स्थानासाठी झगडणारे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आज, बुधवारी आमनेसामने येणार आहेत. या दोनपैकी केवळ एकाच संघाला स्पर्धेत आगेकूच करता येणार असल्याने वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या लढतीचा निकाल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या संघांनी ‘प्ले-ऑफ’मधील स्थान आधीच निश्चित केले आहे. त्यातच सोमवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सला हार पत्करावी लागल्याने त्यांचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आता ‘प्ले-ऑफ’मधील चौथ्या संघासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात चुरस आहे. या दोनही संघांनी १२ सामने खेळले असून मुंबईचे १४ गुण, तर दिल्लीचे १३ गुण आहेत. त्यामुळे मुंबईचा संघ सध्या अधिक भक्कम स्थितीत आहे.
मुंबईला आपल्या गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून निसटता पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्याआधीच्या सहा सामन्यांत मुंबईने विजय मिळवले होते. दुसरीकडे, दिल्लीचा संघ लय मिळविण्यासाठी झगडताना दिसतो आहे. गेल्या पाचपैकी तीन सामन्यांत दिल्लीचा संघ पराभूत झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड मानले जात आहे.
रोहितसाठी सामना खास…
मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मासाठी हा सामना खास ठरणार आहे. गेल्याच आठवड्यात वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला रोहितचे नाव देण्यात आले. आपल्या नावाच्या स्टँडसमोर खेळणे हा अविस्मरणीय अनुभव असेल असे रोहित त्यावेळी म्हणाला होता. आता त्याला ही संधी मिळणार आहे. तसेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही हा त्याचा पहिलाच सामना ठरणार आहे. त्यामुळे तो दमदार कामगिरीसाठी निश्चितपणे उत्सुक असेल. सूर्यकुमार यादव आणि रायन रिकल्टन हे फलंदाज कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील असतील. तिलक वर्माने हंगामाची सुरुवात अप्रतिमरीत्या केली होती. मात्र, गेल्या काही सामन्यांपासून तो लय गमावून बसला आहे. त्याच्या कामगिरीत सुधारणेला मोठा वाव आहे. गोलंदाजीची भिस्त पुन्हा जसप्रीत बुमरा आणि ट्रेंट बोल्ट या तारांकितांवरच असेल.
समीकरण काय?
● मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केल्यास त्यांचे ‘प्ले-ऑफ’मधील स्थान निश्चित.
● दिल्लीकडून हार पत्करावी लागल्यास मुंबईला अखेरच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध (२६ मे) विजय अनिवार्य. मात्र, त्याआधी पंजाबचा संघ दिल्लीला (२४ मे) पराभूत करेल अशीही आशा करावी लागेल.
● दिल्लीने उर्वरित दोनही सामने जिंकल्यास ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश. मुंबईविरुद्ध हार पत्करावी लागल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात. मुंबईविरुद्ध विजय मिळवला, पण नंतर पंजाबविरुद्ध हार पत्करल्यास मुंबई-पंजाब सामन्याच्या निकालावर आगेकूच अवलंबून.
राहुलवर भिस्त; गोलंदाजांची चिंता
दिल्ली कॅपिटल्ससाठी अनुभवी केएल राहुल चमकदार कामगिरी करत आहे. यंदाच्या हंगामात राहुल मधल्या फळीत खेळत होता. परंतु गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने ६५ चेंडूंत नाबाद ११२ धावांची खेळी करताना संधीचे सोने केले. त्याला अन्य फलंदाजांची साथ गरजेची आहे. मात्र, दिल्लीसाठी फलंदाजीपेक्षाही गोलंदाजी हा चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या सामन्यात दिल्लीने दिलेले २०० धावांचे आव्हान गुजरात संघाने एकही गडी न गमावता पूर्ण केले. दिल्लीचे सर्वच गोलंदाज निष्प्रभ ठरले. मिचेल स्टार्कने (१४ बळी) ‘आयपीएल’साठी न परतण्याचा निर्णय घेतल्याने दिल्लीचा संघ अडचणीत सापडला आहे. कर्णधार अक्षर पटेलची कामगिरीही निराशाजनक ठरते आहे.
मुंबई इंडियन्सकडून बेअरस्टोसह तिघे करारबद्ध
मुंबई इंडियन्सचे ‘प्ले-ऑफ’मधील स्थान अद्याप निश्चित झाले नसले, तरी त्यांनी इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसन आणि श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका या खेळाडूंना बाद फेरीसाठी करारबद्ध केले आहे. इंग्लंडचा विल जॅक्स, तसेच दक्षिण आफ्रिकेचे रायन रिकल्टन आणि कॉर्बिन बॉश हे खेळाडू ‘आयपीएल’च्या साखळी फेरीनंतर राष्ट्रीय संघाशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे बाद फेरी अर्थात ‘प्ले-ऑफ’च्या दृष्टीने बदली खेळाडूंना करारबद्ध करणे मुंबईला भाग पडले आहे.
पावसाचा व्यत्यय?
हवामान खात्याने राज्यासाठी पुढील दोन दिवस पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे मुंबई-दिल्ली सामन्यात पावसाच्या व्यत्ययाची शक्यता नाकारता येत नाही. वानखेडेवरील गेल्या सामन्यातही (मुंबई विरुद्ध गुजरात) पावसाने व्यत्यय आणला होता. याचा मुंबई संघाला फटका बसला होता.
● वेळ : सायं. ७.३० वा. ● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.