अहमदाबाद येथे आज पंजाब किंग्जशी सामना

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामाची विजयी सलामीने सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सला त्यानंतर सलग चार सामने गमवावे लागले. त्यामुळे सोमवारी पंजाब किंग्जविरुद्ध होणाऱ्या लढतीत पराभवाची मालिका खंडित करण्याच्या निर्धाराने ते मैदानात उतरतील.

ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाताला गेल्या चार लढतींमध्ये अनुक्रमे मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांनी नमवले. त्यामुळे कोलकाता तूर्तास गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहे. दुसरीकडे सलग तीन सामने गमावल्यावर के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाबने अखेरच्या लढतीत बलाढ्य मुंबई इंडियन्सला नमवले. त्यामुळे कोलकाताला नमवून हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद करण्यासाठी पंजाबचे खेळाडू उत्सुक असतील. अहमदाबादमधील साखळी सामन्यांना सोमवारपासून प्रारंभ होत असल्याने येथील खेळपट्टी कोणासाठी लाभदायक ठरणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

कोलकाता नाइट रायडर्स

गिलकडून सुधारणा अपेक्षित

युवा फलंदाज शुभमन गिल अद्याप या स्पर्धेत फारशी चमक दाखवू शकलेला नाही. पाच लढतींमध्ये त्याने फक्त ८० धावा केल्या आहेत. गिल धडाकेबाज सुरुवात करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांच्यावरील दडपण वाढत आहे. कर्णधार मॉर्गनलाही फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स उत्तम अष्टपैलू योगदान देत आहेत. मात्र वरुण चक्रवर्तीव्यतिरिक्त अन्य गोलंदाजांना बळी मिळवताना संघर्ष करावा लागत आहे.

पंजाब किंग्ज

आघाडीच्या त्रिकुटावरच भिस्त

राहुल, मयांक अगरवाल आणि ख्रिस गेल या आघाडीच्या तीन फलंदाजांवर पंजाबची प्रामुख्याने मदार आहे. या तिघांव्यतिरिक्त शाहरुख खान हाणामारीच्या षटकांत फटकेबाजी करण्यात पटाईत आहे. मुंबईविरुद्धच्या लढतीत गोलंदाजांनीही कामगिरी उंचावल्यामुळे पंजाबची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. फिरकीपटू रवी बिश्नोईचा समावेश त्यांच्यासाठी फलदायी ठरला. मात्र आघाडीची फळी ढेपाळल्यास पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

२७ कोलकाता-पंजाब यांच्यात ‘आयपीएल’मध्ये आतापर्यंत २७ सामने झाले असून कोलकाताने १८, तर पंजाबने नऊ सामन्यांत विजय मिळवला आहे.

वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, स्टार स्पोटर्स २, स्टार स्पोटर्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)