AB de Villiers Playing Wheelchair Cricket Video: आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स सध्या भारतात आहे. मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यादरम्यान एबी स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये कॉमेंट्रीसाठी देखील उपस्थित होता. यादरम्यान त्याने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीचे कौतुकही केले. आरसीबीचा अंतिम सामना पाहण्यासाठीदेखील एबी अहमदाबादमध्ये उपस्थित असणार आहे. दरम्यान एबी डिव्हिलियर्स व्हिलचेयर क्रिकेट खेळताना दिसला, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने व्हीलचेअरवर बसून फलंदाजी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने व्हीलचेअरवर आपल्या नेहमीच्या अंदाजात फटकेबाजी केली. मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे झालेल्या सराव सत्रात डिव्हिलियर्स मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघात सामील झाला होता.

व्हीलचेअरवर बसून डिव्हिलियर्सने उत्तम खेळाची वृत्ती दाखवत काही शानदार फटके खेळले. एवढंच नाही तर डिव्हिलियर्सने विकेट दरम्यान धावण्यासाठी व्हीलचेअरचा वापरही केला. त्याच्या उपस्थितीने खेळाडू आणि चाहतेही भारावले होते.

एबी डिव्हिलियर्स आयपीएल २०२५ वर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. त्याने विराट कोहलीचेही कौतुक केले. तो म्हणाला की कोहली वयाच्या ३० व्या वर्षानंतरही ती ट्रॉफी जिंकण्याची आणि चांगली खेळी करण्याची भूक आणि जोश त्याच्यात आहे.

एबी विराटबदद्ल बोलताना म्हणाला, “मी माझ्या क्रिकेट खेळण्याच्या शेवटच्या वर्षांचा विचार केल्याशिवाय राहू शकत नाहीये. असं नाही की त्याच्याकडे आता फक्त काही वर्षे उरली आहेत. कदाचित तो आणखी ५ वर्षे खेळेल. पण तो वयाच्या तिशीत प्रवेश करत असताना, मी फक्त एवढंच म्हणू शकतो की तो अजूनही दाखवत असलेल्या उर्जेबद्दल, आणखी एक ट्रॉफी जिंकण्याच्या इच्छेबद्दल मला खूप आदर आहे.”

पंजाब किंग्ज विरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोहली मोठी धावसंख्या करू शकला नाही. त्याने १२ चेंडूत १२ धावा केल्या. काइल जेमीसनच्या चेंडूवर कोहलीला जोश इंग्लिसने झेलबाद केले. तरीही एबी डिव्हिलियर्सचा असा विश्वास आहे की कोहलीमध्ये अजूनही उत्कृष्ट कामगिरी करत यशस्वी होण्याची भूक आहे आणि त्याने अंतिम सामन्यासाठी त्याची सर्वोत्तम कामगिरी राखून ठेवली आहे.

डिव्हिलियर्स म्हणाला, “आज मी त्याला बसमधून उतरताना पाहिलं तेव्हा मला हेच दिसले. त्याला खरोखर संघातसाठी आपलं योगदान द्यायचं होतं. त्याने आज (पहिल्या क्वालिफायरमध्ये) चांगली कामगिरी केली की नाही हे महत्त्वाचे नाही. तो अंतिम सामन्यात त्याचे सर्वोत्तम देईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळेल, जिथे त्यांचा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातील विजेत्याशी होईल.