Chennai Super Kings vs Punjab Kings IPL Latest Score Update: आयपीएल २०२३च्या ४१व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाबविरुद्ध चेन्नई संघाचा यापूर्वीचा विक्रम चांगला राहिला नाही. सीएसकेने पंजाबविरुद्धचे मागील तीनही सामने गमावले आहेत. अशा स्थितीत धोनीचा संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने पंजाबसमोर २०१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

चेन्नईच्या डावाच्या शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अष्टपैलू रवींद्र जडेजा बाद झाला. त्यानंतर चेपॉकच्या मैदानात धोनीच्या नावाचा ‘माही-माही’ असा एकाच जयघोष झाला. धोनी त्याच्या पहिल्याच चेंडूवर फटका मारण्यास अपयशी ठरला. मात्र, त्याच्या पुढच्याच चेंडूवर धोनीने एक धाव घेतली शतकाजवळ असणाऱ्या कॉनवेला शतक पूर्ण करण्याची संधी दिली. त्यानंतर सॅम करनने एक चेंडू वाईड टाकला.

चौथ्या चेंडूवर कॉनवेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण लियाम लिव्हिंगस्टनने झेल पकडला पण तो चेंडू जमिनीला लागला असल्याने त्याला नाबाद ठरवले. त्यादरम्यान धोनी स्ट्राईकवर आला आणि चेन्नईच्या चाहत्यांनी त्याच्याकडे षटकाराची मागणी केली. यावेळी चेन्नईची धावसंख्या १८८ अशी होती आणि २००चा आकडा गाठण्यासाठी दोन षटकारांची गरज होती. चाहत्यांची मागणी पूर्ण करत थालाने दोन षटकार मारले आणि चेन्नईला दोनशेपार पोहचवले. पहिला षटकार हा पॉइंटवर आणि दुसरा मिडविकेटच्या दिशेने मारला.

सामन्याच्या पहिल्या डावानंतर धोनीच्या षटकाराविषयी कॉनवेला विचारले असता तो म्हणाला, “नॉन स्ट्रायकरला उभे राहून एम. एस. धोनीचे दोन्ही षटकार पाहणे हा क्षण माझ्यासाठी खूप खास होता. असे धोनीला क्वचितच पाहायला मिळते. यासाठीच आयपीएल खास आहे.” कॉनवेच्या ९१ धावांची खेळीने चेन्नईला मोठी धावसंख्या उभारण्यात हातभार लागला.

हेही वाचा: CSK vs PBKS Match: कॉनवेची तुफानी खेळी तर थालाचे जबराट षटकार! चेन्नईचे पंजाब समोर २०१ धावांचे आव्हान

दोन्ही संघांची आयपीएलमधील कामगिरी

आयपीएल २०२३ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने या सामन्यापूर्वी आठ सामने खेळले आहेत. त्यातील ८ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे, तर ३ सामन्यात त्याना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्स संघाने आठ सामने खेळले असून त्यातील ४ सामन्यात विजय, तर ४ सामन्यात पराभव मिळाला आहे. हा सामना जिंकून स्पर्धेत चांगल्या स्थितीत पोहोचण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.