IPL2023, MS Dhoni: आज आयपीएलच्या ५५व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात निकराची लढत झाली, परंतु त्याआधी दिल्लीने चेन्नईचा कर्णधार एम.एस. धोनीसाठी एक सुंदर असा व्हिडिओ शेअर केला आहे. केवळ चाहत्यांमध्येच नाही तर क्रिकेटपटूंमध्येही धोनीची प्रचंड क्रेझ आहे. दोन्ही संघांमधील सामन्यापूर्वी, कॅपिटल्सच्या खेळाडूंना ‘कॅप्टन कूल’चे एका शब्दात वर्णन करण्यास सांगितले होते, त्यानंतर खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रकारे मजेशीर, भावनिक अशी उत्तरे दिली.

वास्तविक, क्रिकेट कारकिर्दीला निरोप देण्याच्या मार्गावर असताना ‘माही’बद्दल चाहत्यांमध्ये आणखी क्रेझ वाढू लागली आहे. मात्र, निवृत्तीच्या या मुद्द्यावर त्यां कधीही स्पष्ट उत्तर दिलेले नाही. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डीसीच्या खेळाडूंकडून एम.एस. धोनीचे एका शब्दात वर्णन करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये त्याच्याविषयी पहिले मत इशांत शर्माकडून व्यक्त करण्यात आले, जो धोनीला त्याचा ‘मोठा भाऊ’ मानतो.

अक्षर पटेलने सीएसकेच्या कर्णधाराचे ‘मिस्टर कूल’ असे वर्णन केले, तर मिचेल मार्शने त्याला ‘लीजेंड’ आणि चेतन साकारियाने त्याला ‘थलैवा’ म्हटले. याशिवाय खलील अहमद याने देखील त्याचे ‘लिजेंड’ असे वर्णन केले. यासोबतच यश धुलने त्याला ‘लिजेंड फॉरएव्हर’ अशी उपमा दिली, तर प्रियम गर्गने सांगितले की त्याच्यासाठी असा कोणताही शब्द नाही, तो पूर्णपणे वेगळा आहे शब्दचं अपुरे आहेत. सरफराज खानने ‘बिग फॅन’ म्हटले आणि शेवटी मुकेश कुमारने ‘तो शब्दांच्या पलीकडे आहे’ असे उत्तर दिले.

सामन्यात काय झाले?

चेन्नईच्या या सामन्यात सीएसकेने दिल्लीला २७ धावांनी पराभूत केले. या विजयामुळे चेन्नई प्ले ऑफ्सच्या जवळ पोहचला आहे. असे असतानाच या सामन्यासाठी हजेरी लावलेली चेन्नईचा कर्णधार एम.एस. धोनी याची मुलगी झिवा ही सामना संपल्यानंतर आपल्या वडिलांना जाऊन बिलगली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात धोनीने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ८ चेंडू खेळले. यामध्ये एक चौकार व दोन षटकारांच्या मदतीने त्याने २० धावा केल्या. तो फटकेबाजी करत असताना त्याची मुलगी झिवा ही टाळ्या वाजवताना दिसून आली होती. त्यानंतर सामना संपल्यावर ती धावत आपल्या वडिलांकडे गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा: IPL 2023: कॅप्टन कूल एम.एस. धोनीने दीपक चाहरला कानाखाली मारली? Video पाहून चाहतेही झाले आश्चर्यचकित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सर्व फलंदाजांच्या थोड्या थोड्या योगदानाच्या जोरावर २० षटकात ८ बाद १६८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे पहिले तीन गडी लवकर परतले. मधल्या फळीत रायली रुसो व अक्षर पटेल यांनी वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. या पराभवामुळे आता दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. तसेच, चेन्नई प्ले ऑफ्ससाठी पात्र होण्यापासून केवळ एक अंक दूर आहे.