आयपीएल २०२५ स्पर्धेतील ३५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात दिल्लीचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. दिल्लीकडून फलंदाजी करताना केएल राहुलने २०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत २८ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने एकमेव षटकार खेचला. या षटकारासह त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. यासह त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मालाही मागे सोडलं आहे.

केएल राहुलच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

केएल राहुलने नेहमीप्रमाणेच आक्रमक फलंदाजी करून डावाची सुरूवात केली. सलामीवीर फलंदाज अभिषेक पॉरेल बाद झाल्यानंतर केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याला या डावात चांगली सुरूवात मिळाली होती. मात्र चांगल्या सुरूवातीचं मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला.

केएल राहुलने खेचलेला एकमेव षटकार हा त्याच्या आयपीएल करिअरमधील २०० वा षटकार ठरला आहे. असा कारनामा करणारा तो ११ वा फलंदाज ठरला आहे. तर सर्वांत जलद हा रेकॉर्ड करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. केएल राहुलने या रेकॉर्डमध्ये एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज फलंदाजांना मागे सोडलं आहे. त्याने हा कारनामा १२९ व्या डावात करून दाखवला आहे. या यादीत वेस्टइंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. गेलने ६९ डावात २०० षटकारांचा पल्ला गाठला होता. तर आंद्रे रसेलने हा कारनामा ९७ व्या डावात केला होता.

आयपीएल स्पर्धेत सर्वांत वेगवान २०० षटकार पूर्ण करणाऱ्या फलंदाजांची यादी

ख्रिस गेल -६९ डावात
आंद्रे रसेल – ९७ डावात
केएल राहुल – १२९ डावात
एबी डिव्हिलियर्स – १३७ डावात
डेव्हिड वॉर्नर – १४८ डावात

आयपीएल स्पर्धेत सर्वांत जलद २०० षटकार पूर्ण करणारे भारतीय फलंदाज

केएल राहुल – १२९ डावात
संजू सॅमसन – १५९ डावात
एमएस धोनी – १६५ डावात
विराट कोहली- १८० डावात
रोहित शर्मा -१८५ डावात