Hardik Pandya Statement on Mumbai Indians Defeat: आयपीएल २०२५च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. २०० अधिक धावांच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबने मुंबईला ३ विकेट्सने पराभूत केलं. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सला एखाद्या संघाने २०० अधिक धावांच्या सामन्यात पराभूत केलं आहे. मुंबईचा हा मोठा विक्रम कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वात मोडला आहे. सामन्यानंतर हार्दिक काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या भागीदारीच्या जोरावर २०३ धावांचा डोंगर उभारला. यासह पंजाबला विजयासाठी २०४ धावांचं लक्ष्य दिलं होतं. मुंबई इंडियन्सने सुरूवात काहीशी चांगली केली, पण मुंबईचे सर्वच गोलंदाज या सामन्यात यशस्वी ठरले नाही. मुंबईला मोठा धक्का बुमराहच्या गोलंदाजीचा बसला.

जसप्रीत बुमराहने या सामन्यात ४ षटकांमध्ये ४० धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. बुमराहच्या एका षटकात जोश इंग्लिसने २० धावा केल्या आणि पॉवरप्लेमध्ये चांगली धावसंख्या उभारली. तर गोलंदाजीत इतर गोलंदाजही महागडे ठरले. दरम्यान श्रेयस अय्यरने एकट्याने ८३ धावांची खेळी करत नेहाल वधेराच्या ४८ धावांच्या खेळीने संघाला विजयापर्यंत नेलं.

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पंड्या म्हणाला, “श्रेयसने ज्याप्रकारे धोका पत्करून काही फटके खेळले ते खूपच कमाल होते. मला वाटतं त्यांनी (पंजाब किंग्स) निश्चितच चांगली फलंदाजी केली. मुंबईने जी धावसंख्या उभारली होती ती चांगली होती, फक्त त्यासाठी गोलंदाजी युनिट चांगल्या कामगिरीची आवश्यकता होती, जी या मोठ्या सामन्यांमध्ये मला वाटतं फार महत्त्वाची असते.”

“मी म्हटल्याप्रमाणे ते (पंजाब किंग्स संघ) खूप शांत होते. त्यांनी आमच्यावर दबाव आणला आणि मला वाटतं आम्ही ज्याप्रमाणे रणनिती आखली ती नीट अंमलात आणू शकलो नाही. मी विकेटला दोष देणार नाही. कारण जर आम्हाला चांगली कामगिरी करायची होती तर एखाद्या गोलंदाजाने योग्य लेंग्थवर गोलंदाजी केली पाहिजे होती किंवा योग्य वेळी योग्य गोलंदाजाला संधी दिली पाहिजे होती. तर आता निकाल काहीतरी वेगळा असता,” असं कर्णधार पंड्या पुढे म्हणाला.

पंजाबला विजयासाठी ४ षटकांत ४१ धावांची गरज होती. तेव्हा बोल्टला १७व्या षटकात गोलंदाजी दिली आणि त्याने १० धावा दिल्या. तर शशांक सिंग रनआऊटही झाला. सामन्यानंतर बुमराहला १७वं षटक देता आलं असतं का याबद्दल हार्दिकला विचारलं असता तो म्हणाला, “कदाचित स्थिती वेगळी असली असती पण त्याला ते षटक देणं खूप ललकर झालं असत. परिस्थिती पाहता १८ चेंडू शिल्लक असताना बुमराहला गोलंदाजी दिली तरी तो स्पेशल काहीतरी करू शकतो. पण आज ते घडलं नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या क्वालिफायरमधील पराभवानंतर स्पर्धेबाहेर झाला आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्सचे संघ स्पर्धेत भिडणार आहेत. हा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.