Hardik Pandya on Shubman Gill: आयपीएल २०२३ मधील दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघांत पार पडला. या सामन्यात गुजरातने मुंबईचा ६२ धावांनी पराभव केला. दरम्यान गुजारतसाठी शुबमन गिल आणि मोहित शर्माने महत्वाची भूमिका बजावली. या विजयानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने शुबमन गिलचे कौतुक करताना एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

हार्दिक पाड्याने आयपीएल २०२३ च्या क्वालिफायर सामन्यातील विजयानंतर शुबमन गिलबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने शुबमन गिलचे खूप कौतुक केले. त्याचबरोबर तो म्हणाला, गिल भविष्यात केवळ आयपीएलमध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक मोठा सुपरस्टार बनणार आहे.

शुबमन गिलने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध जबरदस्त शतक ठोकले. त्याने ६० चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १२९ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. यामुळेच गुजरातचा संघाला २३३ धावांचा मोठा डोंगर उभारता आला. त्याचबरोबर गिलने आयपीएलमधील आपल्या सर्वोच्च खेळीची नोंद करताना अनेक विक्रमांना गवसनी घातली.

हेही वाचा – MI vs GT: “ग्रीन आणि सूर्याने चांगली फलंदाजी केली, पण…”; शुबमनचे कौतुक करताना रोहित शर्माने पराभवावर दिली प्रतिक्रिया

तो सुपरस्टार खेळाडू असल्याचे सिद्ध होईल –

शुबमन गिलच्या या खेळीने कर्णधार हार्दिक पांड्या खूपच प्रभावित झाला. सामन्यानंतर झालेल्या संवादादरम्यान तो म्हणाला, “शुबमन गिलची स्पष्टता आणि आत्मविश्वास अप्रतिम आहे. त्याची आजची खेळी त्याच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक होती. ही खेळी खेळताना त्याने कधीही घाई केली नाही. कोणीतरी बॉल फेकत आहे आणि तो मारतोय असं दिसत होतं. आंतरराष्ट्रीय आणि फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये तो सुपरस्टार खेळाडू असल्याचे सिद्ध होईल. मी त्याच्याशी सतत बोलत असतो.”

हेही वाचा – MI vs GT: मोहम्मद शमीने ट्रेंट बोल्टला मागे टाकत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

सामन्याबद्दल बोलायचे, तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने निर्धारित २० षटकांत ३ गडी गमावून २३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ १८.२ षटकांत १७१ धावांवर गारद झाला. या विजयासह गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सचा सामना होणार आहे.