IPL 2025 Playoff Scenario: आयपीएल २०२५ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ ठरले आहेत. पण टॉप २ मध्ये कोणते संघ खेळणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. टॉप २ मधे प्रवेश करणाऱ्या संघांना दोनदा अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळते. त्यामुळे चारही संघांमध्ये चढाओढ सुरू आहे. टॉप ४ संघ ठरले, त्यावेळी हे चित्र जवळजवळ स्पष्ट झालं होतं. मात्र, स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघांनी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि आता पंजाब किंग्जला लागोपाठ धक्के दिले. त्यामुळे टॉप २ चं दार चारही संघांसाठी उघडलं आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाला टॉप २ मध्ये प्रवेश करण्यासाठी काय करावं लागेल? कसं असेल समीकरण? जाणून घ्या.
गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्सने आतापर्यंत १३ सामन्यांमध्ये १८ गुणांची कमाई केली आहे. शेवटचा सामना जिंकून गुजरातचा संघ २० गुणांपर्यंत पोहोचू शकतो. दुसऱ्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्जने १३ सामन्यांमध्ये १७ गुणांची कमाई केली आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत १३ सामन्यांमध्ये १७ गुणांची कमाई केली आहे. तर चौथ्या स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने १३ सामन्यांमध्ये १६ गुणांची कमाई केली आहे.
गुजरातचा शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून गुजरातचा संघ २० गुणांसह अव्वल स्थान निश्चित करू शकतो. गुजरातचा संघ एकमेव संघ आहे जो २० गुणांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, गुजरातचा पराभव झाला तर, उर्वरित तिन्ही संघांना अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी असणार आहे. बंगळुरूचा शेवटचा सामना लखनऊविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानी पोहोचू शकतो.
मुंबई इंडियन्ससाठी कसं असेल समीकरण?
टॉप २ मध्ये कोणते २ संघ प्रवेश करणार हे मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज सामन्यानंतर जवळजवळ स्पष्ट होऊन जाईल. मुंबईला जर अव्वल स्थान गाठायचं असेल तर साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करावा लागेल. पण त्यासाठी मुंबईला गुजरात आणि बंगळुरूचा पराभव व्हायला हवा अशी प्रार्थना करावी लागेल. जर बंगळुरूचा संघ सामना जिंकला आणि गुजरातच्या पराभवानंतरही मुंबईचा संघ पंजाबला पराभूत करून टॉप २ मध्ये प्रवेश करू शकतो. यादरम्यान गुजरात आणि मुंबई या दोन्ही संघांचा नेट रनरेट महत्वाचा ठरेल.