IPLच्या इतिहासात पहिल्यांदा एकाच सामन्यात चक्क दोन सुपर ओव्हर रंगल्या. रविवारच्या (१८ ऑक्टो) सामन्यात मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघांमध्ये संध्याकाळचा सामना रंगला. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १७७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राहुलच्या दमदार खेळीच्या बळावर पंजाब संघाने सामना बरोबरीत सोडवला.

सुपर ओव्हरमध्ये बुमराहने भेदक मारा करत ५ धावा देऊन २ बळी घेतले. पंजाबने केलेल्या ५ धावांचा मोहम्मद शमीने यशस्वी बचाव केला. त्यामुळे पहिली सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्याने एकाच सामन्यात दुसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यावेळी पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने गोलंदाजी करत ११ धावा दिल्या. यात पोलार्डच्या एका चौकाराचा समावेश होता. पोलार्डने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावण्याचा प्रयत्न केला होता, पण मयंक अग्रवालने अत्यंत खुबीने चेंडू आत ढकलत संघासाठी २ धावा वाचवल्या.

त्याच्या या प्रयत्नाचं खुद्द जॉन्टी ऱ्होड्सने कौतुक केलं. “मयंक अग्रवालने सीमारेषेवर चेंडू अडवला तो प्रयत्न अफलातून होता. आम्ही दुसरी सुपर ओव्हर सुरू होण्याआधी चर्चा केली होती की जेव्हा पोलार्ड क्रीजवर असेल तेव्हा चेंडू हवेत उंच आणि वेगाने येईल. असा वेळी आपल्याला चेंडू आत ढकलणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि आम्ही जशी चर्चा केली. अगदी तसाच प्रयत्न मयंकने केला. त्याच्या त्या प्रयत्नाला सलाम!” असे ऱ्होड्स पंजाबच्या ट्विटरवरील व्हिडीओत बोलताना म्हणाला.

दरम्यान. त्यानंतर १२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेलने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार खेचत मयंक अग्रवालने संघाला विजय मिळवून दिला.