येत्या २६ मार्चपासून क्रिकेट चाहत्यांना आयपीएलचा थरार पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या या पंधराव्या हंगामात दोन संघांची वाढ झाल्यामुळे सर्वच लढती रोमहर्षक होणार आहेत. दरम्यान, सर्वच संघांनी ट्रॉफी जिंकण्यासाठी कंबर कसलेली असताना सर्वांत तरुण खेळाडूंचा समावेश असलेल्या सनरायझर्स हैदराबाद या संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सहा वर्षांपासून हा संघ जेतेपदाच्या रेसमध्ये असून यावेळीतरी या संघाला सूर गवसणार का ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएल क्रिकेटमध्ये २०१६ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर या संघाने आतापर्यंत मोठी कामगिरी केलेली नाही. मात्र यावेळी या संघाकडे इतर संघांच्या तुलनेत सर्वांत तरुण खेळाडू आहेत. त्यामुळे नव्या दमाचे हे खेळाडू मैदानावर जादू करतील अशी आशा क्रिकेट रसिकांना आहे. यावेळी संघाचे नेतृत्व केन विल्यम्सन करणार असून त्याला साथ देण्यासाठी यावेळी हैदराबादच्या ताफ्यात पूर्वी पंजाबकडून खेळणारे निकोलस पूरन आणि एडन मार्करॅम असे दिग्गज खेळाडू असणार आहेत. तसेच संघात बाकीचे सर्व खेळाडू तरुण असल्यामुळे ते प्राणपणाने झुंज देतील अशी संघाला आशा आहे.

सनरायझर्स हैदराबादने भूवनेश्वर कुमार, उमर मलिक यांना रिटेन केलेलं आहे. या दोघांसोबत यॉर्कर किंग म्हणून ओळख असलेला टी नटराजनदेखील हैदराबाद संघाकडून खेळणार आहे. नटराजनच्या सोबतीला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जानसेन असणार आहे. नटराजन आणि जानसेन या जोडीमुळे हैदराबादची गोलंदाजी मजबूत होणार आहे.

गोलंदाजीकडे द्यावे लागणार लक्ष

असे असले तरी या संघामध्ये बहुतांश खेळाडू तरुण आहेत. त्यांना आयपीएलमध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव नाही. त्यामुळे अनुभवाच्या दृष्टीकोनातून हा संघ कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विल्यम्सन, मार्करॅम आणि पूरन या दिग्गजांकडेच फलंदाजीची मुख्य जबाबदारी असणार आहे. दुसरीकडे भूवनेश्वर आणि नटरजान यांना दुखापत झालेली असल्यामुळे संघाला गोलंदाजीकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. या दोघांशिवाय कार्तिक त्यागी वगळता हैदराबादकडे गोलंदाजीसाठी दुसरा चांगला पर्याय नाही.

हैदराबादचा संपूर्ण संघ

केन विल्यम्सन (कर्णधार), अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जगदीशा सुचिथ, एडन मार्करॅम, मार्को जॅन्सन, रोमारिओ शेफर्ड, शॉन अॅबॉट, आर समर्थ, शशांक सिंग, सौरभ दुबे, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारुकी

हैदराबादचे संभाव्य बेस्ट प्लेइंग इलेव्हन

राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा / आर समर्थ, केन विल्यम्सन (कर्णधार), निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक, टी नटराजन / कार्तिक त्यागी

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 sunrisers hyderabad team know about players list and playing 11 prd
First published on: 25-03-2022 at 13:05 IST