चेन्नई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे जेतेपदासाठी प्रबळ दावेदार संघ बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचे लय राखण्याचे लक्ष्य असेल.

चेन्नई आणि राजस्थान या दोनही संघांनी हंगामाच्या सुरुवातीला तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी चमक दाखवली आहे. चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने अप्रतिम कामगिरी केली असून त्याला एका सामन्यात डेव्हॉन कॉन्वेची, तर गेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेची उत्तम साथ लाभली. दुसरीकडे, राजस्थानचे सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांना पहिल्या चेंडूपासून आक्रमक शैलीत खेळताना प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर दडपण आणण्यात यश आले आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे आघाडीच्या फळीतील फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वाचे लक्ष असेल.

हा सामना चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. सामना जसजसा पुढे जातो, तसतशी फलंदाजी करणे अवघड होते. चेन्नईकडे रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर आणि मोईन अली यांसारखे, तर राजस्थानकडे रविचंद्रन अश्विन आणि यजुवेंद्र चहल यांसारखे दर्जेदार फिरकीपटू आहेत. त्यामुळे खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळाल्यास दोन्ही संघांतील फलंदाजांना धावा करण्यासाठी झुंजावे लागू शकेल. त्यामुळे लढतीत ज्या संघाचे फलंदाज सर्वोत्तम कामगिरी करतील, त्यांना विजयाची अधिक संधी असेल.

* वेळ : सायं. ७.३० वाजता

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओ सिनेमा

ऋतुराजकडून सातत्याची अपेक्षा

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने यंदाच्या हंगामातील तीनही सामन्यांत चमक दाखवली आहे. गुजरात टायटन्स (९२ धावा) आणि लखनऊ सुपर जायंट्स (५७) या संघांविरुद्ध अर्धशतके झळकावल्यानंतर ऋतुराजने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद ४० धावांची खेळी करत चेन्नईला विजय मिळवून दिला. त्यामुळे त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची चेन्नईला अपेक्षा असेल.

जैस्वाल, बटलरवर मदार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजस्थानच्या फलंदाजीची मदार यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर या सलामीवीरांवर असेल. जैस्वाल आणि बटलर यांनी यंदाच्या हंगामात अनुक्रमे १६४.४७ आणि १८०.९५च्या धावगतीने धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी प्रत्येकी दोन अर्धशतके साकारली आहेत. राजस्थानसाठी कर्णधार संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांचे योगदानही महत्त्वाचे ठरेल. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, यजुवेंद्र चहल यांची कामगिरी राजस्थानसाठी निर्णायक ठरेल.