आयपीएलच्या धर्तीवर जगभरात विविध टी-२० क्रिकेट लीग सुरू झाल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीगचे यश पाहता अनेक देशांनी अशा लीग सुरू केल्या आहेत. सध्याच्या घडीला जगातभरात चिक्कार टी-२० लीगचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये सर्वच देशातील खेळाडू खेळत असतात. आयसीसीची मान्यता असलेल्या जगातील काही निवडक आणि प्रसिध्द लीग स्पर्धांची माहिती मिळवूया.
– quiz
बिग बॅश लीग (BBL)
बिग बॅश लीग (BBL) ही ऑस्ट्रेलियामधील ट्वेंटी-२० क्रिकेट लीग आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०११ मध्ये आठ फ्रँचायझींचा समावेश असलेली ही लीग सुरू केली ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू आणि जगातील विविध भागांतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या लीगमध्ये सहभागी होतात. क्रिकेट ऑस्ट्रेलिया महिला बिग बॅश लीगचेही आयोजन करते. ही स्पर्धासुध्दा आयपीएलसारखीच खेळवली जाते.
डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत अॅडलेड स्ट्रायकर्स, ब्रिस्बेन हिट, होबार्ट हरिकेन्स, मेलबर्न रेनेगेड्स, मेलबर्न स्टार्स, पर्थ स्क्रॉचर्स, सिडनी सिक्सर्स, सिडनी थंडर असे आठ संघ सहभागी होतात. पर्थ स्क्रॉचर्स या संघाच्या नावे सर्वाधिक ३ जेतेपद आहेत. प्रत्येक संघात दोनच खेळाडू खेळवता येतात. या स्पर्धेतील विजेत्या संघाला ४,५०,००० डॉलर्स रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.
पाकिस्तान सुपर लीग (PSL)
पाकिस्तान सुपर लीग (PSL) ही पाकिस्तानमधील ट्वेंटी-२० क्रिकेट लीग आहे. या लीगची लाहोरमध्ये ९ सप्टेंबर २०१५ मध्ये पाच संघांसह सुरूवात करण्यात आली. आता या स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. पाकिस्तानचे खेळाडू हे भारतातील पहिल्या आयपीएलमध्ये खेळले होते, पण दोन्ही देशातील संबंध दुरावल्याने आयपीएलचे दरवाजे पाकिस्तानसाठी बंद झाले. त्यामुळे या लीगची सुरूवात झाली.
इस्लामाबाद युनायटेड, कराची किंग्स, लाहोर कलंदर्स, मुलतान सुलतान्स, पेशावर झाल्मी, क्वेटा ग्लॅडिएटर्स ही या स्पर्धेतील संघांची नावे आहेत. यंदा झालेल्या पीएसएल स्पर्धेचे जेतेपद इस्लामाबाद युनायटेड संघाने जिंकले आहे.
कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL T20)
कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) ही ट्वेंटी-२० क्रिकेट लीग आहे. फ्रँचायझी-आधारित ही लीग वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाद्वारे आयोजित केली जाते आणि ती २०१३ मध्ये सुरू झाली. ही स्पर्धा Hero MotoCorp द्वारे प्रायोजित केली जात असून या स्पर्धेच शीर्षक Hero CPL असे आहे.बार्बाडोस ट्रायडंट्स, गयाना अमेझॉन वॉरियर्स, जमैका तल्लावालाज, सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स, सेंट ल्युसिआ झोयूक्स, त्रिनिबागो नाईट रायडर्स अशा सहा संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. त्रिनिबागो नाईट रायडर्स संघ स्पर्धेचा चॅम्पियन आहे. तर भारतीय अभिनेता शाहरुख खान या संघाचा सहमालक आहे.
वेस्ट इंडिजचे सर्वच खेळाडू जगभरात होणाऱ्या लीग स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात. विडींज संघाच्या खेळाडूंची सातत्यपूर्ण कामगिरी पाहून वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने २०१३ मध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग सुरू केली. अलन स्टॅनफोर्ड या अब्जाधीशाने पुढाकार घेत २००६ मध्ये स्टॅनफोर्ड ट्वेंटी-२० लीग सुरू केली. पण भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली स्टॅनफोर्डला अटक झाल्याने ही स्पर्धा खोल रूतत गेली. पण नंतर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने स्वत पुढे येऊन आयपीएलच्या धर्तीवर ही स्पर्धा सुरू केली.
बांगलादेश प्रीमियर लीग (BPL T20)
बांगलादेश प्रीमियर लीग ही एक व्यावसायिक क्रिकेट लीग आहे ज्यामध्ये सात फ्रँचायझींचा सहभाग आहे. इंडियन प्रीमियर लीग पाहता त्यांनी २०१२ मध्ये या स्पर्धेची स्थापना केली. BPL ही बांगलादेशच्या तीन व्यावसायिक क्रिकेट लीगपैकी एक आहे. चट्टोग्राम चॅलेंजर्स, कुमिला वॉरियर्स, ढाका प्लाटून, खुलना टायगर्स, राजशाही रॉयल्स, रंगपूर रेंजर्स, सिल्हेट थंडर असे सात संघ एकमेकांविरूध्द भिडतात. ढाका प्लाटूनने सर्वाधिक वेळा जेतेपद आपल्या नावे केले आहे. मॅचफिक्सिंग प्रकरणामुळे लीगच्या प्रतिमेला धक्का बसला होता. यावर तोडगा म्हणून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने माजी कर्णधार मोहम्मद अशरफुलवर कारवाई केली. बॅरिसल बुल्स हा संघ आता या स्पर्धेत खेळत नाही.
लंका प्रीमियर लीग (LPL T20)
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेला २०११ मध्ये सुरूवात केली पण २०१२ मध्ये या स्पर्धेती सुरूवात झाली. २०१३ आणि २०१४ मध्ये प्रायोजकांनी माघार घेतल्याने लीग रद्द करावी लागली. लीग २०१८ मध्ये सुरू करण्याचा हेतू होता, परंतु श्रीलंका क्रिकेटने ती वारंवार पुढे ढकलली. लंका प्रीमिअर लीग या नव्या नावानिशी लीग सुरू केली आणि २०२० मध्ये कोविडचे संकट डोक्यावर असताना या लीगचे सामने खेळवले गेले होते. २०२३ पर्यंत, स्पर्धेचे चार हंगाम झाले आहेत. कोलंबो स्ट्राईकर्स, दांबुला आभा, गॅले मार्वल्स, जाफना किंग्ज, बी-लव्ह कँडी असे संघ एकमेकांविरूध्द खेळताना दिसतात. वानिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखालील बी-लव्ह कँडी संघाच्या नावे २०२३ चे जेतेपद आहे.
एसए ट्वेंटी लीग (SA20)
एसए ट्वेंटी ही दक्षिण आफ्रिकेत खेळली जाणारी देशांतर्गत ट्वेंटी-२० क्रिकेट लीग आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने २०१८ साली या स्पर्धेली सुरुवात केली. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने २०१७ मध्ये फ्रेंचायझी ट्वेंटी-२० ग्लोबल लीगची स्थापना केली. प्रसारणाचा करार आणि प्रायोजक नसल्यामुळे पहिला हंगाम एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला. जून २०१८ मध्ये, त्याची जागा मंझी सुपर लीगने घेतली, ज्यामध्ये सहा क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) मालकीचे संघ होते. या लीगलाही यश मिळाले नाही. SA20 ची स्थापना क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने २०२२ मध्ये आफ्रिका क्रिकेट डेव्हलपमेंट लिमिटेड द्वारे केली. या लीगचा पहिला सामना २०२३ मध्ये खेळवण्यात आला.
एमआय केपटाऊन, डर्बन्स सुपर जायंट्स, जोबर्ग सुपर किंग्ज, पार्ल रॉयल्स, प्रेटोरिया कॅपिटल्स, सनरायझर्स इस्टर्न केप हे संघ या स्पर्धेत सहभागी होतात. सनरायझर्स इस्टर्न केप या संघाने सलग दोन वर्षे एडन माक्ररमच्या नेतृत्त्वाखाली या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-२० (CLT20)
बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी एकत्र येत चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-२० स्पर्धा खेळवण्यास सुरूवात केली. २००८ मध्ये पहिला सीझन खेळवण्यात येणार होता, पण भारतात २६/११ चा दहशतवादी हल्ला झाल्याने ही स्पर्धा २००९ मध्ये खेळवण्यात आली. २००८ ते २०१४ या काळात ही स्पर्धा खेळवली गेली. त्यानंतर इतर देशातील खेळाडू नसल्याने कमी प्रेक्षक संख्या, प्रायोजकांची कमतरता आणि अन्य कारणांमुळे ही स्पर्धा बंद करण्यात आली. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघांनी या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.