आयपीएल २०२४ च्या २०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी पराभव करत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आपले विजयाचे खाते उघडले आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या मुंबईला रोहित शर्माने दणक्यात सुरूवात करून दिली. रोहितने २७ चेंडूंमध्ये ४९ धावांची शानदार खेळी केली, यादरम्यान त्याने सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. या सामन्यानंतर रोहित शर्माला एमआयच्या ड्रेसिंग रूममधील सामनावीर पुरस्कार देण्यात आल, त्यानंतर रोहितने खेळाडूंशी संवाद साधला.
मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही खेळाडूने या सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या नाहीत, परंतु तरीही संघाने २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात २३४ धावा केल्या. रोहित आणि इशान किशन यांनी मिळून ७ षटकांत ८० धावा जोडल्या आणि त्यानंतर टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांनी मिळून अखेरच्या षटकांमध्ये संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. इशान ४२ धावा करून बाद झाला. टीम डेव्हिडने नाबाद ४२ आणि रोमारियो शेफर्डने नाबाद ३९ धावा केल्या. शेफर्डने १० चेंडूत ३९ धावा केल्या आणि तो या सामन्याचा सामनावीर ठरला. पण ड्रेसिंग रूममध्ये सामनावीर ठरलेल्या रोहितने खेळाडूंशी काय संवाद साधला, जाणून घ्या.
रोहित शर्मा खेळाडूंशी संवाद साधताना म्हणाला, “आपली फलंदाजी सुरेख झाली. पहिल्या सामन्यापासून अशा कामगिरीच्या आपण प्रतीक्षेत होतो. यातून हे दिसतं की वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत. सगळ्या फलंदाजांची एकत्रित कामगिरी महत्त्वाची ठरते. संघ म्हणून जे लक्ष्य होतं ते साध्य केल्यामुळेच इतकी मोठी धावसंख्या आपण उभारू शकलो. आपण बऱ्याच काळापासून अशा सांघिक कामगिरीबद्दल बोलत आहोत आणि फलंदाजी प्रशिक्षक मार्क बाउचर आणि कर्णधाराला हेच अपेक्षित आहे.अशीच कामगिरी पुढे करत राहू.”
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना ११ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.