Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings IPL 2024 Highlights: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा ६ विकेटसन पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ५ गडी गमावून १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने दमदार सुरुवात करत ११ चेंडू शिल्ल्क ठेवत १८.१ षटकांत १६६ धावा करत सामना जिंकला. सनरायझर्स हैदराबादचा हा स्पर्धेतील दुसरा विजय आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने चालू हंगामातील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर आता सलग दोन सामने गमावले आहेत. या पराभवानंतरही चेन्नई सुपर किंग्ज संघ तिसऱ्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे.

सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माला त्याच्या झंझावाती खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. अभिषेकने सामन्यातील पहिले षटक टाकले, ज्यात त्याने सात धावा दिल्या. त्यानंतर फलंदाजी करताना अभिषेकने तडाखेबंद खेळी केली. त्याने १२ चेंडूत ३७ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले.

Live Updates

IPL 2024 Highlights, SRH vs CSK: इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या १८ व्या सामन्यात सनरायझर्स संघाने चेन्नई सुपर किंग्जचा ६ विकेट्स आणि ११ चेंडू राखून पराभव केला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने सहज विजय मिळवला.

22:41 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: विजयासाठी २४ चेंडूत २३ धावांची आवश्यकता

१६व्या षटकात मोईन अलीच्या चौथ्या चेंडूवर शाहबाज अहमदला पायचीत केले. बाद केल्याचं अपील केल्यावर अंपायरने आऊट न दिल्याने मोईन अलीने रिव्ह्यूची मागणी केली आणि त्यानंतर शाहबाजला बाद देण्यात आले. बाद होण्यापूर्वी त्याने १९ चेंडूत एका षटकारासह १८ धावा दिल्या आहेत. हैदराबादला विजयासाठी २४ चेंडूत २३ धावांची आवश्यकता आहे.

22:33 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: ५ षटकांत हैदराबादला ३१ धावांची आवश्यकता

हैदराबादच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात करून दिल्याने संघ सध्या विजयाच्या जवळ आले. पण चेन्नईचा संघही अटीतटीची लढत आहे. संघाला विजयासाठी ३० चेंडूत ३१ धावांची आवश्यकता आहे.

22:30 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: मारक्रमचे अर्धशतक आणि झेलबाद

सामन्याच्या १४व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर मारक्रमने ३६ चेंडूत ५० धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मोईन अलीने त्याला पायचीत केले.

22:20 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: हेड झेलबाद

१०व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हेड जडेजाकरवी झेलबाद झाला. हेडने तुफानी फटकेबाजी करत होता, ज्याने २४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३१ धावा केल्या. १० षटकांनंतर २ बाद १०७ धावा केल्या आहेत.

21:57 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: हैदराबादची तुफान फटकेबाजी

पॉवरप्लेमध्ये हैदराबादच्या फलंदाजांनी वादळी फलंदाजी केली करत १ बाद ७८ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा ३२ धावा करत बाद झाल्यानंतर हेड आणि मारक्रमने आक्रमक फलंदाजी केली. मारक्रम सध्या ९ चेंडूत १५ धावांवर खेळत आहे तर हेडने १६ चेंडूत २४ धावा केल्या आहेत. पॉवरप्लेनंतर हैदराबादला विजयासाठी ८४ चेंडूत ८८ धावांची गरज आहे.

21:44 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: अभिषेक शर्माची तुफान फटकेबाजी

अभिषेक शर्माने अवघ्या दोन षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अभिषेकने ३ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने १२ चेंडूत ३७ धावा केल्या. मुकेश चौधरीच्या दुसऱ्या षटकातत त्याने २७ धावा केल्या. तर चहरच्या तिसऱ्या षटकात चौथ्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी १० धावा केल्या. पण षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.

21:32 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: हैदराबादच्या फलंदाजीला सुरूवात

चेन्नईने दिलेल्या १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी हैदराबादचे सलामीवीर हेड आणि अभिषेक शर्मा उतरले आहेत. तर चेन्नईकडून दीपक चहरने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. दुसऱ्याच चेंडूवर हेड स्लिप बाद होता होता वाचला.

21:14 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK:चेन्नईने हैदराबादला विजयासाठी दिले १६६ धावांचे आव्हान

चेन्नईने २० षटकांत ५ बाद १६५ धावा केल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. शिवम दुबे आणि रहाणेच्या फलंदाजीने संघाचा डाव सावरला. दुबेने ४५ धावा तर रहाणेने ३५ धावा केल्या. त्यामुळे संघ या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला नाही. तर जडेजानेही ४ चौकार मारत २३ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. तर मिचेल १३ धावा करत बाद झाला.

हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत एकाही गोलंदाजाने जास्त धावा लुटल्या नाहीत. मुख्य गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भुवनेश्वर कुमार, नटराजन, पॅट कमिन्स, शाहबाज अहमद आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

20:58 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: १७ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या

१७ षटकांमध्ये चेन्नईने ४ बाद १३९ धावा केल्या आहेत. सलामीवीर स्वस्तात बाद झाल्याचा फटका धावा करताना चेन्नईला बसला आहे. सध्या मैदानात डॅरिल मिचेल आणि जडेजाची जोडी आहे.

20:49 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: अजिंक्य रहाणे बाद

दुबेनंतर पुढील षटकात अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. उनाडकटच्या १५व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रहाणे ३० चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३५ धावा करून बाद झाला. सध्या चेन्नईची धावसंख्या ४ बाद १२७ धावा आहे.

20:47 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: शिवम दुबे झेलबाद

कमिन्सच्या १४ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर शिवम दुबे भुवनेश्वरकडून झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी दुबेने संघासाठी महत्त्वाची २४ चेंडूत २ चौकारांच्या आणि ४ षटकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या. अवघ्या ५ धावांसाठी त्याचे अर्धशतक हुकले.

20:31 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: रहाणे-दुबेची २९ चेंडूत ५१ धावांची भागीदारी

शिवम दुबेची शानदार फटकेबाजी या सामन्यातही कायम आहे. शिवमने आतापर्यंत २१ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या आहेत, तर रहाणेने त्याला साथ देत २८ धावा करत मैदानात कायम आहे.

20:19 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: १० षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या

चेन्नईने १० षटकांमध्ये २ बाद ८४ धावा केल्या आहेत. सध्या मैदानावर शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेची जोडी आहे. सलामीवीर रचिन रवींद्र ९ चेंडूत १२ धावा तर ऋतुराज गायकवाडने २१ चेंडूत २६ धावा करून बाद झाले. पण रहाणेने संघाचा डाव उचलून धरला.

20:09 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: येताच शिवम दुबेची फटकेबाजी सुरू

ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या शिवम दुबेने षटकार लगावत आपले खाते उघडले. दुबेने येताच ५ चेंडूत ११ धावा केल्या. तर नवव्या षटकाची सुरूवातही त्याने चौकार लगावत केली.

20:04 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: ऋतुराज गायकवाड झेलबाद

चांगल्या लयीत असलेला ऋतुराज गायकवाडला बाद करत हैदराबादने मोठी विकेट मिळवली आहे. शाहबाजच्या आठव्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात गायकवाड झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी ऋतुराजने २१ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या.

20:01 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: पॉवरप्लेनंतर चेन्नईची धावसंख्या

रचिन रवींद्र बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाडची जोडी मैदानात आहे. पॉवरप्लेनंतर १ बाद ४८ धावसंख्या आहे. सहाव्या षटकात गायकवाड आणि रहाणेने मिळून १५ धावा केल्या.

19:46 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: चेन्नईचा सलामीवीर झेलबाद

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर रचिन रवींद्रने मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात रचिन बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने ९ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १२ धावा केल्या. या विकेटसह भुवनेश्वरने आयपीएल २०२४ मधील पहिली विकेट मिळवली आहे. सध्या चेन्नईची धावसंख्या १ बाद २५ धावा इतकी आहे.

19:36 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: चेन्नईच्या डावाला सुरूवात

चेन्नई वि हैदराबादच्या सामन्याच्या पहिल्या डावाला सुरूवात झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्रची जोडी मैदानात आहे. तर अभिषेक शर्माने हैदराबादकडून गोलंदाजीला सुरूवात केली.

19:13 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन):

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महिश तीक्ष्णा

19:12 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन):

अभिषेक शर्मा, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय, टी नटराजन

19:03 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: हैदराबादने जिंकली नाणेफेक

सनरायझर्स हैदराबाद संघाने सामन्याची नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल केले आहेत. हैदराबादचा सलामीवीर मयंक अग्रवाल ठिक नसल्याने त्याच्या जागी नितीश रेड्डीला संघात सामील केले आहे. तर चेन्नईच्या संघात तीन मोठे बदल आहेत. मुस्तफिझूर मायदेशी परतल्याने संघाचा भाग नसेल. पाथिराना दुखापत असल्याने तो आजच्या सामन्यात खेळणार नाही. त्यांच्या जागी मोईन अली, महिश तीक्ष्णा आणि मुकेश चौधरी यांचा समावेश करण्यात आला आहे.

18:17 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: चेन्नईचा मुस्तफिझूर रहमान

चेन्नईचा गोलंदाज मुस्तफिझूर रहमान हा आजच्या सामन्यात खेळू शकणार नाही. आयपीएलनंतर लगेचच होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी त्याच्या व्हिसाच्या प्रक्रियेसाठी तो मायदेशी परतला आहे. तिन्ही सामन्यांमध्ये संघासाठी महत्त्वाची भूमिका साकारणारा मुस्तफिझूर चेन्नईसाठी सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे.

18:09 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: पिच रिपोर्ट

काही दिवसांपूर्वी याच मैदानावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. एसआरएचने मुंबईविरुद्ध २७७ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात एमआयनेही कडवी झुंज देत २४६ धावा करत केवळ ३१ धावांनी पराभव पत्करला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना काळ्या मातीच्या खेळपट्टीवर खेळवला जाईल. सनरायझर्सचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांच्या मते, ही खेळपट्टी लाल मातीच्या खेळपट्टीपेक्षा खूप वेगळी असेल ज्यावर हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सचा सामना खेळवला गेला होता.

18:08 (IST) 5 Apr 2024
SRH vs CSK: हेड टू हेड

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एकूण २० सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये सीएसकेने १५ सामने जिंकून आपले वर्चस्व राखले आहे. चेन्नईविरुद्ध हैदराबादला केवळ ५ वेळेस विजय मिळवण्यात यश आले आहे.

IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Highlights: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल २०२४ मधील १८वा सामना खेळवला गेला. ज्यात सांघिक कामगिरीच्या जोरावर हैदराबादने घरच्या मैदानावर दुसरा विजय नोंदवला