IPL 2025 Playoffs Qualification Scenario: आयपीएल २०२५ ला येत्या १७ मे पासून पुन्हा सुरूवात होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्याकरता स्थगित करण्यात आली होती. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी होणार होता तर आता नव्या वेळापत्रकानुसार ३ जूनला होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत सध्या ७ संघ आहेत, त्यामुळे आता प्लेऑफचं समीकरण कसं असणार आहे, जाणून घेऊया.
आयपीएलमधील उर्वरित १७ सामने नवीन ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. तर काही संघांना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदाही होणार नाहीये. कारण सामने फक्त सहा शहरांमध्येच मर्यादित राहतील. गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावणारे गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेऑफसाठी पात्रता मिळविण्याच्या मार्गावर असले तरी, पुढील आठवड्यात स्पर्धा आणखी अटीतटीची होऊ शकते.
पंजाब किंग्ज ११ सामन्यांतून १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना आणखी एका विजयाची आवश्यकता आहे. तर १२ सामन्यांंनंतर १४ गुणांसह मुंबई इंडियन्स तिसरे स्थान तर ११ सामन्यांनंतर १३ गुणांसह दिल्ली कॅपिटल्स चौथे स्थान मिळवण्यासाठी अटीतटीची लढत देणार आहेत.
गुजरात टायटन्स – १६ गुण
गुजरात टायटन्स (GT) प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून फक्त एका विजयापासून दूर आहे. १८ गुणांसह संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरू शकतो. जर शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखालील संघाने उर्वरित तीन सामने गमावले तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात, कारण चार संघांना अजूनही १७ किंवा त्याहून अधिक गुण मिळवण्याची शक्यता आहे.
उर्वरित सामने – दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – १६ गुण
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) देखील प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. आरसीबीला दोन्ही सामने घरच्या मैदानावर उर्वरित २ सामने खेळायचे आहेत, त्यामुळे हे दोन्ही सामने जिंकल्यास संघ टॉप-२ मध्ये राहू शकतो.
उर्वरित सामने – दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स
पंजाब किंग्स – १५ गुण
प्लेऑफमध्ये जागा निश्चित करण्यासाठी पंजाब किंग्ज (PBKS) संघाला दोन विजयांची आवश्यकता आहे. सध्या, संघ १७ गुणांवर आहे, जे पुरेसे नसणार आहेत. कारण पाच संघ १७ किंवा त्याहून अधिक गुण मिळवू शकतात. संघाला काही करून आपले तीनपैकी दोन सामने जिंकावे लागतील, अन्यथा प्लेऑफचं समीकरण पूर्ण बिघडेल.
उर्वरित सामने – राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स – १४ गुण
मुंबईचा संघ सध्या चौथ्या स्थानी आहे. मुंबईला उर्वरित दोन सामन्यांपैकी दोन्ही सामने जिंकावे लागतील. दोन सामने जिंकल्यास मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल. मुंबई इंडियन्सने दोन्ही सामने गमावले तर ते स्पर्धेबाहेर होऊ शकतात. पण याचबरोबर मुंबईचा नेट रन रेट १.२५६ आहे, जो सर्वात कमालीचा आहे.
उर्वरित सामने – पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स – १३ गुण
सनरायझर्सविरुद्ध पावसामुळे मिळालेला १ गुण दिल्ली कॅपिटल्ससाठी पात्रता फेरीत मौल्यवान ठरू शकतो. १५ गुणांसह, काही निकाल जर दिल्लीच्या बाजूने लागले तरच संघ टॉप-४ मध्ये पोहोचेल. १७ गुण मिळवण्यासाठी देखील इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून असू शकतात. पाच संघ अजूनही १७ गुण मिळवू शकतात. उर्वरित तिन्ही सामने जिंकल्यास संघ प्लेऑफ गाठू शकतात.
उर्वरित सामने – गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स
कोलकाता नाईट रायडर्स – ११ गुण
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. संघ जास्तीत जास्त १५ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. केकेआरला शर्यतीत कायम राहायचं असेल तर उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. जर केकेआरने दोन्ही सामने जिंकले तर पंजाब संघाने एक तरी सामना गमावावा अशी संघ आशा करेल. यासह दिल्लीने सर्व सामने गमवावे अशी आशा करावी लागेल.
उर्वरित सामने – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद
लखनौ सुपर जायंट्स – १० गुण
तीन सामने शिल्लक असताना, जर इतर अनेक निकाल लागले तर लखनौ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकते. जर ऋषभ पंतच्या संघाने तिन्ही सामने जिंकले तर त्यांना पात्रता मिळविण्यासाठी मुंबई आणि दिल्ली कॅपिटल्सने एकापेक्षा जास्त सामने जिंकू नयेत अशी आवश्यकता असेल.
उर्वरित सामने – सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू