आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामना धरमशाला येथे खेळवला जात होता. पण टेक्निकल आणि सुरक्षेच्या कारणामुळे हा सामना रद्द करण्यात आला. जम्मू काश्मीर आणि आजूबाजूच्या परिसरात रेड अलर्ट दिल्याने ब्लॅक आऊट करण्यात आल्याने सामना थांबवला गेला. दरम्यान आता खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे.

आता पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला सुरक्षित ठिकाणी परत आणण्यासाठी योजना आखली आहे. यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. रिपोर्ट्सच्या मते, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंसाठी एक विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे आणि खेळाडूंना धरमशाला शहरातून इतर ठिकाणी आणले जाईल.

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना धर्मशाळाहून उना येथे नेले जाईल. उना येथून एक विशेष ट्रेन निघेल जिथून खेळाडूंना दिल्लीला आणता येईल. दोन तुकड्यांच्या माध्यमातून खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि मॅच ऑफिशियल्स या ट्रेनद्वारे दिल्लीकडे रवाना होतील.

पंजाब किंग्ज फलंदाजी करत असताना ११ व्या षटकात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममधील एक फ्लडलाइट टॉवर बंद झाला. चाहत्यांना तांत्रिक बिघाड असल्याचा संशय आला, परंतु त्यानंतर प्रेक्षकांना स्टेडियम सोडण्यास सांगण्यापूर्वी आणखी दोन फ्लडलाईट बंद झाले. त्यानंतर आयपीएलने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी इंडिया टुडेशी बोलताना सामना रद्द करण्याच्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले. सैकिया म्हणाले की बीसीसीआय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार पुढील निर्णय घेईल. बीसीसीआय सचिव म्हणाले, “सध्या परिस्थिती स्थिर नाही आणि म्हणूनच आम्ही आजचा सामना रद्द केला आहे. केवळ धरमशालामधील स्थितीमुळे नाही तर शेजारील देशाकडून वाढत्या तणावामुळे देखील हा सामना रद्द केला आहे.”

“खेळाडू, प्रेक्षक आणि सपोर्ट स्टाफची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही राष्ट्राच्या हितासाठी सर्वकाही करू. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि त्यानुसार पुढील निर्णय घेऊ,” असे ते म्हणाले.