अहमदाबाद : गेल्या सामन्यात पाठदुखीमुळे मैदानाबाहेर जावे लागलेल्या शुभमन गिलने तंदुरुस्ती प्राप्त केल्याची माहिती असून ‘आयपीएल’मध्ये आज, शुक्रवारी होणाऱ्या सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तो गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला गुजरातचे संघ-संचालक विक्रम सोलंकी यांनी गिलच्या उपलब्धतेबाबत आम्ही सकारात्मक असल्याचे म्हटले.
गुजरात संघाला गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला. राजस्थानचा १४ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीचा झंझावात रोखण्यात गुजरातचे गोलंदाज अपयशी ठरले. या पराभवामुळे गुजरात संघाची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी घरसण झाली आहे. आता ‘प्ले-ऑफ’साठी दावेदारी भक्कम करायची झाल्यास गुजरातने विजयपथावर परतणे आवश्यक आहे.
राजस्थानविरुद्धच्या लढतीत गिलने ५० चेंडूंत ८४ धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्यानंतर तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. त्याच्या अनुपस्थितीत रशीद खानने गुजरात संघाचे कर्णधारपद भूषविले. पाठदुखीच्या त्रासामुळे आपण क्षेत्ररक्षणासाठी न आल्याचे सामन्यानंतर गिलने सांगितले. मात्र, दुखापत गंभीर नसून आपण केवळ खबरदारी घेतल्याचेही गिलने स्पष्ट केले होते. त्या सामन्यानंतर गुजरात संघाला तीन दिवसांची विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी गिल उपलब्ध असणे अपेक्षित आहे.
यंदाच्या हंगामात गुजरात आणि हैदराबाद हे संघ यापूर्वीही आमनेसामने आले होते. त्यावेळी गुजरातने हैदराबादच्या मैदानावर विजय मिळवला होता. आजचा सामना अहमदाबाद येथे होणार असून आधीच्या पराभवाची परतफेड करण्याचा हैदराबाद संघाचा मानस असेल. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी हैदराबादला विजय अनिवार्य आहे. हैदराबादचा संघ नऊ सामन्यांत केवळ सहा गुण मिळवू शकला आहे. त्यामुळे सध्या ते नवव्या स्थानी आहेत.
● वेळ : सायं. ७.३० वा.
● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.
सलामीच्या जोडीवरच भिस्त
● गुजरात आणि हैदराबाद या दोनही संघांची सलामीच्या जोडीवर भिस्त आहे. एकीकडे साई सुदर्शन (४५६ धावा) आणि कर्णधार शुभमन गिल (३८९) या गुजरातच्या सलामीवीरांनी चमकदार कामगिरी केली आहे.
● दुसरीकडे तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक शर्मा (२४०) आणि ट्रॅव्हिस हेड (२६१) या हैदराबादच्या सलामीच्या जोडीला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. हाच दोन संघांतील मुख्य फरक आहे.
● साई आणि गिलला तिसऱ्या क्रमांकावरील जोस बटलरचीही (४०६ धावा) साथ लाभते आहे. हैदराबादसाठी हेन्रिक क्लासन आणि इशान किशन यांसारख्या फलंदाजांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.
गोलंदाजांसमोर मोठे आव्हान
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमची सपाट खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरते. यंदाच्या हंगामात या मैदानावर झालेल्या चारपैकी तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. या मैदानावरील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने २४३ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात गुजरातने २३२ धावा केल्या होत्या. त्यामुळे येथील सपाट खेळपट्टीवर तडाखेबंद फलंदाजांना रोखताना गुजरात आणि हैदराबाद या संघांच्या गोलंदाजांची कसोटी लागेल. गुजरातकडे रशीद खान, प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज, तर हैदराबादकडे कर्णधार पॅट कमिन्स आणि मोहम्मद शमी यांसारखे नामांकित गोलंदाज आहेत.