MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK : आयपीएल २०२४ चा २९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. चेन्नई संघात यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका बजावणारा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जसाठी २५० टी-२० सामने पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर एमएस धोनीने आयपीएलमध्ये सीएसकेसाठी ५००० धावा पूर्ण केल्या. या सामन्यात धोनीने ४ चेंडूचा सामना करताना ३ षटकारांच्या जोरावर नाबाद २० धावा केल्या.

विराट कोहलीनंतर धोनी दुसरा खेळाडू –

एमएस धोनी टी-२० फॉरमॅटमध्ये संघासाठी २५० किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी, विराट कोहली या यादीत अव्वल स्थानावर आहे, ज्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून २५८ टी-२० सामने खेळले आहेत. २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जपासून सुरू झालेल्या या प्रवासात एमएस धोनीने अनेक मोठे पराक्रम केले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली सुपर किंग्सने ५ वेळा आयपीएल ट्रॉफी आणि २ वेळा चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकली आहे.

एमएस धोनीने सीएसकेसाठी रचला इतिहास –

एमएस धोनी २००८ पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. तो सीएसकेसाठी आतापर्यंत २५० सामने खेळला आहे. या कालावधीत त्याने ५०१६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २३ अर्धशतकांचा समावेश आहे. तो आता सीएसकेसाठी ५००० धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सुरेश रैनाने हा पराक्रम केला होता. रैनाने सीएसकेसाठी ५५२९ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – VIDEO : पंजाब किंग्जचा विजय प्रीती झिंटाला पडला होता महागात, संघासाठी बनवावे लागले होते १२० आलू पराठे

एमएस धोनी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २२६ वा सामना खेळत आहे, तर त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये सीएसकेसाठी २४ सामने खेळले आहेत. एमएस धोनीने चेन्नईसाठी आतापर्यंत ५०१६ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये ४५६७ आणि चॅम्पियन्स लीगमध्ये ४४९ धावा केल्या आहेत.एमएस धोनीने आयपीएलच्या १४ हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले आहे.

हेही वाचा – Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

आयपीएलचा १७वा हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याने युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. आयपीएल २०२४ मध्ये तो यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. या मोसमात धोनीने आतापर्यंत ४ सामन्यात फलंदाजी केली आहे, ज्यामध्ये त्याने ३७, १, १ आणि २० अशा नाबाद धावा केल्या आहेत. एमएस धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १६ चेंडूत ३७ धावांची तुफानी खेळी केली होती.