Punjab Kings vs Mumbai Indians, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेतील व्लालिफायर २ चा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळाला. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीच्या बळावर पंजाब किंग्जने २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. यासह हा सामना ५ गडी राखून जिंकला आणि आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. पंजाब किंग्जचा अंतिम सामना येत्या ३ जूनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध होणार आहे.
सामना कुठे फिरला?
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला होता. मुंबई इंडियन्सने पहिल्या डावात फलंदाजी करताना २०३ धावांचा डोंगर उभारला. करो या मरो सामन्यात इतक्या मोठ्या धावांचा डोंगर सर करणं मुळीच सोपं नसतं. याचा दबाव पंजाबच्या टॉप ऑर्डरवर स्पष्टपणे दिसून आला. पंजाबचे ३ प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतले. मुंबई इंडियन्सने विजयाच्या दिशेने एक पाऊल टाकलं होतं. आता दुसरा टप्पा म्हणजे, श्रेयस अय्यरला बाद करायचं होतं. मात्र, त्याचा फॉर्म पाहता हे शक्य दिसत नव्हतं. त्याने मुंबईच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही.
तर दुसऱ्या बाजूने मुंबईचा माजी खेळाडू नेहाल वढेरा पंजाबकडून खेळताना मुंबईवर भारी पडला. त्याने श्रेयस अय्यरसोबत मिळून महत्वाची भागीदारी केली आणि सामना मुंबईपासून दूर नेला. यादरम्यान त्याला बाद करण्याची संधी मिळाली होती. मात्र, मुंबईने ही संधी गमावली. तर झाले असे की, या सामन्यातील १० व्या षटकात नेहाल वढेराने शॉट चेंडूवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मुंबईकडे त्याला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र, सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या ट्रेंट बोल्टने हा महत्वाचा झेल सोडला. मुंबईने हा झेल पकडला असता, तर कदाचित मुंबईचा संघ या सामन्यात कमबॅक करू शकला असता. नेहालने या सामन्यात फलंदाजी करताना २९ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि २ गगनचुंबी षटकार मारले. वढेराच्या या खेळीमुळे श्रेयस अय्यरवरील दबाव कमी झाला. वढेरा बाद झाल्यानंतर अय्यरने मोठे फटके खेळून पंजाबला विजय मिळवून दिला.
अंतिम सामन्यात पंजाब- आरसीबी भिडणार
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने क्वालिफायर १ सामन्यात पंजाब किंग्ज संघाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता क्वालिफायर २ सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत पंजाब किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना रंगणार आहे. हा सामना ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.