Rajat Patidar, Virat Kohli Viral Video: आयपीएल २०२५ स्पर्धा सुरू होण्याआधीच मोठा बदल पाहायला मिळाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली. अनेक दिग्गज खेळाडूंचा वारसा लाभलेल्या या संघाची जबाबदारी रजत पाटीदार व्यवस्थितरीत्या पार पाडेल का? असा प्रश्न होता. मात्र, त्याने ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला १८ वर्षांत पहिलं जेतेपद जिंकून दिलं. याआधी तीन वेळा हा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, कुठल्याही कर्णधाराला अंतिम फेरीत विजय मिळवता आला नव्हता. अखेर १८ वर्षांची प्रतीक्षा संपवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपल्या पहिल्या जेतेपदावर नाव कोरलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ही ट्रॉफी विराट कोहलीसाठी जिंकली होती. कारण गेल्या १८ वर्षांपासून तो या संघाला ट्रॉफी जिंकून देण्याच्या प्रयत्नात होता. अखेर त्याचं स्वप्न रजत पाटीदारने पूर्ण केलं आहे.

विराट कर्णधार नसला तरीदेखील रजत पाटीदारने त्याला कर्णधाराचा मान दिला. एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात रजत पाटीदार विराटसोबत चर्चा करताना दिसून येत आहे. आयपीएल संपल्यानंतर विजेत्या संघाचा कर्णधार कॅमेऱ्यावर सही करण्याची प्रथा आहे.

मात्र, रजतने विराटला कॅमेऱ्यावर सही करण्याची विनंती केली. याआधी असं कुठल्याही कर्णधाराने केलं नव्हतं. त्यामुळे रजत पाटीदारचं विशेष कौतुक होत आहे. विराटने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला १८ वर्ष दिली. या १८ वर्षांत त्याने कठीण काळातही संघाची साथ कधीच सोडली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयात विराट कोहलीचाही मोलाचा वाटा आहे. या हंगामात त्याने फलंदाजी करताना दमदार कामगिरी केली आहे. या हंगामातील १५ सामन्यांमध्ये त्याने ५४.७५ च्या सरासरीने ६५७ धावा केल्या. यासह रजत पाटीदारच्या नावेही मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पाहिल्याच हंगामात नेतृत्व करताना ट्रॉफी जिंकणारा चौथा कर्णधार ठरला आहे. या यादीत शेन वॉर्न, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात अनेक दिग्गज कर्णधार होऊन गेले. ज्यात विराट कोहलीसह राहुल द्रविड, अनिल कुंबळे, डॅनियल विटोरी आणि फाफ डू प्लेसिससारख्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, या दिग्गजांनाही ही ट्रॉफी जिंकता आली नव्हती.