Salman Khan old tweet goes Viral after MI vs pbks qualifier 2 : आयपीएल २०२५ च्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज संघ फायनलमध्ये पोहचला आहे. रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाबने (PBKS) मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. यानंतर आता ३ जून रोजी पंजाब आणि आरसीबीमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. यादरम्यान बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सुमारे दहा वर्षांपूर्वी केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सलमान खानने २०१४ मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (तेव्हाचे ट्वीटर) वर “झिंटाची टीम जिंकली का?” अशी पोस्ट केली होती. या पोस्टला इतक्या वर्षांनंतर पंजाब किंग्जकडून उत्तर देण्यात आले आहे.

संघाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून “सी यू इन द फायनल भाई! (भाई, तुम्हाला फायनलमध्ये भेटू!) ” अशी पोस्ट करण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर या पोस्टची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

मुंबईला नमवलं

दरम्यान मुंबई विरोधातील सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. मुंबई इंडियन्सकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने प्रत्येकी ४४–४४ धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने ३८ आणि नमन धीरने ३७ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २०३ धावांवर पोहोचवली.

आयपीएल २०२५ हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने अय्यरच्या ४१ चेंडूत नाबाद ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर सहा चेंडू शिल्लक असताना आपले लक्ष्य गाठले. पाच चौकार आणि आठ षटकार ठोकणाऱ्या अय्यरने सामन्याच्या शेवट एक गगनचुंबी आणि मॅचविनिंग सिक्सर ठोकून केला. या विजयाबरोबरच पंजाबचा संघ दुसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये दाखल झाला आहे. ३ जून रोजी याच मैदानावर हा सामना होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलच्या १८ व्या हंगामात फायनलमध्ये पोहचलेले दोन्ही संघ हे पहिले जेतेपद जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्ज संघाला हरवून अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. त्यामुळे पंजाब किंग्ज अंतिम सामन्यात त्या पराभवाचा बदला घेणार का? हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.