Shashank Singh on Shreyas Iyer and Ricky Ponting Leadership: आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जने शानदार कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. पंजाबने अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सने पराभव केला, यासह पंजाब किंग्स संघ आता प्लेऑफमध्ये क्वालिफायर-१ खेळणार आहे. संघ, कोच, संघ व्यवस्थापन सर्वांनीच श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली आहे आणि त्याचं संघाच्या कामगिरीत मोठं योगदान असल्याचं म्हटलं. पण यादरम्यान शशांक सिंगने संघातील वातावरणाबद्दल बोलताना मोठा खुलासा केला आहे.

संघाचा फिनिशर शशांक सिंगने प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी संघात तयार केलेल्या वातावरणाबाबत वक्तव्य केलं. शशांकने युजवेंद्र चहलसारख्या वरिष्ठ खेळाडूला आणि संघाच्या बस ड्रायव्हरला दिल्या जाणाऱ्या समान वागणुकीचे कौतुक केले, ज्यातून संघातील एकता दिसून येते.

मुंबईविरूद्ध सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना शशांक सिंगने प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगचे कौतुक केले. तो म्हणाला, “माझ्या कारकिर्दीत आतापर्यंत मी ज्या प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे त्यापैकी रिकी पॉन्टिंग हा सर्वोत्तम प्रशिक्षक आहे.” शशांकने आधी ब्रायन लाराचा उल्लेख केला होता, पण आता या यादीत पॉन्टिंगचाही समावेश त्याने केला. तो म्हणाला की पॉन्टिंगने केवळ संघाची मानसिकता बदलली नाही तर खेळाडूंचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आत्मविश्वासही वाढवला.

“रिकी सरांनी आमची मानसिकता पूर्णपणे बदलली आहे. त्यांनी आम्हाला एकमेकांचा आदर करायला आणि काळजी घ्यायला शिकवलं. आपण हे करायला हवं असे म्हणणे सोपे आहे, पण ते अंमलात आणणं आणि ते टिकवून ठेवणं ही वेगळी गोष्ट आहे. रिकी सरांनी अशी संस्कृती निर्माण केली जिथे प्रत्येकजण एकमेकांना मदत करतो आणि त्यांचा आदर करतो.”

रिकी पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यर यांनी संघातील सर्वांना समान आदर देण्याची संस्कृती कशी निर्माण केली याचे एक मनोरंजक उदाहरण शशांकने दिले. तो म्हणाला, “”पहिल्या दिवसापासूनच रिकी आणि श्रेयसने आम्हाला सांगितले होते की आमच्या संघातील वरिष्ठ खेळाडू युझवेंद्र चहल आणि संघाच्या बस ड्रायव्हरलाही समान आदर देतील आणि त्यांनी याचं पालनही केलं. जितका मान चहलला दिला तितकाच मान त्यांनी संघाच्या बस ड्रायव्हरलाही दिला. ही गोष्ट आमच्या संघातील एकता आणि संस्कृती कशी आहे हे दर्शवतं.”

शशांक सिंगने त्याचा जुना मित्र आणि कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरचं कौतुक केलं. त्याने सांगितले की श्रेयस गेल्या १०-१५ वर्षांपासून त्याचा मित्र आहे, पण त्याच्या नेतृत्वाखाली खेळणे हा एक वेगळा अनुभव होता. “श्रेयसने सर्वांना स्वातंत्र्य दिले. फक्त मलाच नाही तर २५ खेळाडूंना, सपोर्ट स्टाफला, कंटेंट टीमला, मीडिया टीमला आणि लॉजिस्टिक्समध्ये सहभागी असलेल्या सर्वांना. हीच त्याच्याबद्दलची सर्वात खास गोष्ट आहे.”

शशांक पुढे म्हणाला, “श्रेयस आणि रिकी सरांनी पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट सांगितलं होतं की आपल्याला असं वातावरण निर्माण कराव लागेल जिथे आपण एकमेकांची काळजी घेऊ आणि आदर करू. जर आपण असं केलं तर त्याचे परिणाम आपोआप दिसून येतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाब किंग्जने या हंगामात शानदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा ९ चेंडू शिल्लक ठेवत सात विकेट्सने पराभव केला. या विजयासह पंजाबने केवळ गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले नाही तर प्लेऑफमधील आपले स्थानही निश्चित केले. शशांकने या विजयाचं पूर्ण श्रेय संघाला दिलं आणि म्हटलं की रिकी पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्त्वाचं हा निकाल आहे.