IPL 2025 Shreyas Iyer Ness Wadia Viral Video: श्रेयस अय्यरच्या ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर विक्रमी विजय मिळवला. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर २०४ धावांचे लक्ष्य १९ षटकांत गाठत ११ वर्षांनी अंतिम फेरीत धडक मारली. पंजाब किंग्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर टीम हॉटेलमध्ये केक ठेवण्यात आली होता. यादरम्यानचा पंजाब किंग्सचे सहमालक आणि श्रेयस अय्यर यांचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्सने यंदाच्या लिलावामध्ये पैसा खर्च करून संपूर्ण नवा संघ तयार केला आणि श्रेयस अय्यरला संघाचे कर्णधारपद दिले. तर रिकी पॉन्टिंगची कोच म्हणून नियुक्ती केली. पॉन्टिंग-अय्यरच्या जोडीने उत्कृष्ट नेतृत्त्व करत संघाला अंतिम फेरीपर्यंत नेलं. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कर्णधार श्रेयसने मॅचविनिंग खेळी करत उत्कृष्ट फटकेबाजी केली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
श्रेयस अय्यरने षटकारांची आतिषबाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. श्रेयसने मुंबई इंडियन्सवरील या विजयानंतर जल्लोष न करता शांतपणे सेलिब्रेशन केले. तर संघाची मालकिण प्रीती झिंटा हिने मात्र दणक्यात सेलिब्रेशन केलं. दरम्यान संघ टीम हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे सर्वजण उपस्थित होते.
कर्णधार आणि सामन्याचा सामनावीर ठरलेला श्रेयस अय्यर केक कापण्यासाठी पुढे आला. तेव्हा तिथे संघाचे सहमालक नेस वाडिया उपस्थित होते. श्रेयस आणि नेस वाडिया यांनी केक कापल्यानंतर वाडिया यांनी श्रेयसला केक भरवला आणि त्याची पाट थोपटली. यानंतर पुढे होत त्यांनी श्रेयसच्या गालावर किस दिली. संपूर्ण संघ टाळ्या वाजवत कौतुक करत होता. श्रेयसने तितक्यात तिथे असलेला टिश्यू पेपर उचलला आणि लगेचच आपला गाल पुसला.
श्रेयसची ही प्रतिक्रिया असलेला हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. चाहतेही श्रेयसच्या या कृतीवरून त्याचा बिनधास्त स्वभावाबद्दल बोलत आहेत. चाहत्यांनी या प्रसंगाचे अनेक विविध व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यासह आयपीएमध्ये एक नवा चॅम्पियन संघ यंदा मिळणार आहे. हा अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या म्हणजेच ३ जून रोजी खेळवला जाईल.