IPL 2025 Hardik Pandya Shubman Gill Rivalry Video: आयपीएल २०२५ मधील एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला गेला.यामध्ये मुंबई इंडियन्सने गुजरातवर २० धावांनी विजय मिळवत दुसऱ्या क्वालिफायरचं तिकिट मिळवलं. पण या सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे कर्णधार आणि भारतीय खेळाडू हार्दिक पंड्या आणि शुबमन गिल यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या ८० धावांच्या खेळीसह आणि इतर फलंदाजांच्या योगदानासह गुजरात टायटन्सला २२८ धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. गुजरातकडून साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी उत्कृष्ट भागीदारी रचत मुंबईकडून सामना हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण जसप्रीत बुमराहच्या एका यॉर्करने सुंदरला माघारी धाडत गुजरातच्या विजयावर पाणी फेरलं. यासह इतर गोलंदाजांच्या मदतीने मुंबईने हा सामना २० धावांनी जिंकला.

तत्त्पूर्वी नाणेफेकीदरम्यान जे दृश्य दिसलं त्याने सर्वच जण अवाक् झाले. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याची नाणेफेक मुंबई इंडियन्सने जिंकली. तेव्हा मुंबई संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गिल नाणं हवेत उंचावल्यानंतर हार्दिक हेड्स कॉल केला आणि हेड्स पडल्याने हार्दिकने नाणेफेक जिंकली.

रवी शास्त्रीबरोबर बोलण्यासाठी येताना सहसा दोन्ही संघांचे कर्णधार हस्तांदोलन करतात. त्याप्रमाणे हार्दिक पंड्यानेही हात मिळवण्यासाठी गिलच्या दिशेने हात पुढ केला, पण गिलने त्याला हात मिळवला नाही आणि त्याच्याकडे पाहत पुढे निघून गेला. हार्दिकही पुढे आला आणि संघ प्रथम फलंदाजी करणार असल्याचा निर्णय त्याने सांगितला. ही विचित्र घटना पाहून सगळेच अवाक् झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर गुजरातचा संघ धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल पहिल्याच षटकात बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. यादरम्यान हार्दिक पंड्याने धावत येत या विकेटचं जोरदार सेलिब्रेशन केलं. पंचांच्या निर्णयावर गिलने रिव्ह्यू घेतला होता आणि त्याच वेळी हार्दिक पंड्या त्याच्या बाजूने धावत जात असताना त्याच्या प्रतिक्रियेने सर्वांना आश्चर्यचकित केले. पंड्या गिलकडे पाहत जोरात ओरडत सेलिब्रेशन करता करता निघून गेला. ज्याचा व्हीडिओही व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान गिलची विकेट गेल्यानंतर हार्दिक आणि गिलमधील टॉसदरम्यानचा व्हीडिओ परत दाखवत या दोघांमध्ये सगळं ठिक आहे का हा प्रश्न उपस्थित केला होता.