Travis Head Practicing for T20 World Cup in IPL 2024: सनरायझर्स हैदराबादचा ऑस्ट्रेलियन विस्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड यंदा आयपीएलमध्ये तुफान फॉर्मात आहे. हेडने पुन्हा एकदा वादळी फलंदाजी करत लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ३० चेंडूत नाबाद ८९ धावा केल्या. यासह अभिषेक शर्मा (७५) सोबत त्याने एकही विकेट न गमावता हैदराबादला १० विकेट आणि १० षटके राखून विजय मिळवून दिला. पण या विजयानंतर हेडच्या वक्तव्याने टी-२० वर्ल्डकप खेळणाऱ्या सर्वच संघाना धक्का दिला आहे.

सामनावीर ठरलेल्या हेडने सामन्यानंतर सांगितले की, “आज खेळताना मजा आली. १० षटकांमध्ये हे लक्ष्य गाठणे म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे. मी आणि अभिषेक शर्माने अशा अनेक भागीदारी रचल्या आहेत.”

टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने बोलताना हेड म्हणाला, “मी पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देऊन खेळत आहे. चेंडू पाहून मोठे फटके खेळून पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करण्यावर भर आहे. फिरकीपटूविरूद्ध खेळण्यासाठी बऱ्याच काळापासून अधिक मेहनत घेत आहे. वेस्ट इंडिजमध्ये फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल. त्यामुळे संपूर्ण मैदानात ३६० डिग्री फटकेबाजी करणं सध्याचे क्रिकेट पाहता महत्त्वाचे असेल. मी ऑसी संघात अशाच पध्तीने खेळावे अशी त्यांची इच्छा होती आणि आयपीएलमध्येही हैदराबादसाठी खेळताना माझी भूमिका तीच आहे.”

हेही वाचा- IPL 2024: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर मुंबई इंडियन्स संघातील वरिष्ठ नाराज

लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात एसएजी संघाने सनरायझर्स हैदराबादसमोर १६६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण हैदराबादच्या सलामीच्या जोडीने हे लक्ष्य अवघ्या ९.४ षटकांत सहज गाठले. हैदराबादसाठी, ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडने २९६.६७ च्या स्ट्राइक रेटने ८ चौकार आणि ८ षटकारांसह केवळ ३० चेंडूंचा सामना करत ८९ धावांचे नाबाद अर्धशतक झळकावले. तर अभिषेक शर्माने २८ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ७५ धावांचे योगदान दिले.