Rohit Hardik Video Viral against SRH Match : हार्दिक पंड्याला सामना दर सामना मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व करणे कठीण होत चालले आहे. पहिल्या सामन्यात जोरदार खेळी करणाऱ्या हार्दिक पंड्या दुसऱ्या सामन्यात कर्णधार म्हणून पूर्णपणे अपयशी ठरला. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी स्फोटक खेळी खेळताना हार्दिकला शस्त्र खाली ठेवण्यास भाग पाडले. सनरायझर्स हैदराबादने पहिल्या ११ षटकांत १६० धावांचा टप्पा ओलांडला होता, त्यामुळे हार्दिक पंड्याला त्याच्या माजी कर्णधाराची मदत घ्यावी लागली आणि सामन्याच्या मध्यावर रोहित शर्मा स्वतः क्षेत्ररक्षण सेट करताना दिसला. यादरम्यान त्याने हार्दिकला सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाठवले.

रोहित-हार्दिकचा व्हिडीओ व्हायरल –

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार रोहित शर्माला शेवटच्या षटकात सीमारेषेजवळ पाठवल्यामुळे हार्दिक पंड्याला चाहत्यांनी ट्रोल केले होते. बुधवारी सनरायझर्स हैदराबादच्या डावात रोहित शर्माने संघाची धुरा सांभाळली, कारण हार्दिक पंड्या त्याच्या रणनीतीमध्ये पूर्णपणे निष्फळ दिसत होता. आता या सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाठवताना दिसत आहे.

मात्र, रोहित शर्माही सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांसमोर काही करू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. हैदराबादने २० षटकांत ३ गडी गमावून २७७ धावा केल्या. या दरम्यान हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक नाबाद ८० धावा केल्या. सनरायझर्सच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आक्रमक फलंदाजी केली, ज्यामुळे त्यांचा संघ २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाच गडी गमावून २६३ धावांचा विक्रम मोडीत काढण्यात यशस्वी ठरला.

हेही वाचा – हार्दिक पांड्याची ‘ती’ चूक अन् मुंबईने सामना गमावला; माजी क्रिकेटपटूंनी मुंबईच्या कर्णधाराला झापलं

ट्रॅव्हिस हेडने २४ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या, तर अभिषेक शर्माने २३ चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांसह ६३ धावा केल्या. हे दोघेही बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेन (३४ चेंडूत नाबाद ८०, चार चौकार, सात षटकार) आणि एडन मार्करम (२८ चेंडूत नाबाद ४२, दोन चौकार, एक षटकार) यांनी ५५ चेंडूत नाबाद ११६ धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाने २० षटकांत ५ गडी गमावून २४६ धावा केल्या. ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला.