IPL 2024, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore: रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नई संघाने आरसीबीवर विजय मिळवला. तत्त्पूर्वी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यात चालू सामन्यात मजा मस्तीही चालू होती. चेन्नई विरूध्द आरसीबीच्या या पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि कॅमेरून ग्रीन क्रिझवर असताना जडेजा गोलंदाजी करत होता, तेव्हाचा एक व्हिडिओ आणि स्टंप माईकवरील रेकॉर्डिंगसहित समोर आला आहे.

फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आरसीबीच्या डावाच्या ११व्या षटकात ही घटना घडली. जडेजा हा किती झटपट चेंडू टाकत आपले षटक पूर्ण करतो हे तर आपण पाहिलेच आहे. असंच काहीसं तो या सामन्यातही करत होता. तिसऱ्या षटकात कॅमेरून ग्रीनने चेंडू खेळला तो सरळ जडेजाकडे गेला. चेंडू पकडल्यानंतर मस्ती म्हणून चेंडू विराटकडे टाकण्याची त्याने अॅक्शन केली. तर कोहलीने त्याला बॅट लावत प्रत्युत्तर केले. पण नंतर जेव्हा जडेजा लगेच बॉल टाकायला गेला तेव्हा कोहली त्याला म्हणाला, “अरे त्याला श्वास तर घेऊ दे.”

विराट आणि जडेजाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विराट कोहलीचं वाक्य स्टंप माईकवर रेकॉर्ड झालं तर कॉमेंटेटेरही सामन्यादरम्यान या दोघांच्या मजा मस्तीबद्दल बोलत होते. पहिल्या डावात जडेजाला एकही विकेट मिळाली नसली तर त्याने फलंदाजी करताना संघाला विजय मिळवून देण्यासाठी दुबेसोबत चांगली भागीदारी रचली. आरसीबीने दिलेल्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने एक षटक राखून ६ विकेट्सने विजय मिळवला.

चेन्नईच्या प्रत्येक फलंदाजाने संघाच्या धावसंख्येत भर घालत चांगली फलंदाजी केली. पण एका ठराविक टप्प्यावर त्यांनी विकेट गमावल्या. आरसीबीची गोलंदाजी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो, त्यांच्याकडे फिरकीपटू नसल्याने चांगली धावसंखअया करूनही संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरतो. यंदाही तोच प्रकार पाहायला मिळाला आणि चांगली गोलंदाजी न केल्याने संघाला पराभवाचा फटका बसला.