इंडोनेशियामध्ये पार पडलेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंनी विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. एशियाडमध्ये भालाफेकपासून ते अगदी kurash या खेळामध्येही भारतीय खेळाडूंनी सुरेख कामगिरी करत आपलं कौशल्य दाखवून दिलं. अशा या खेळाडूंमधलं एक नाव म्हणजे पिंकी बलहारा.

kurash या खेळात तिने रौप्य पदकाची कमाई करत आपल्या कारकिर्दीतील आणखी एक यशशिखर सर केलं. या यशामागे दडलेलं दु:ख तिने मोठ्या ताकदीने लपवत आपल्या खेळावर मात्र या साऱ्याचा परिणाम होऊन दिला नाही.
एशियाडमध्ये सहभागी होण्यापूर्वी काही दिवसांआधीच तिने आपल्या कुटुंबातील तीन सदस्यांना कायमचं गमावलं होतं. आप्तेष्टांच्या निधनामुळे ती विचलित झाली होती. पण, अखेर आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून मग तिने स्वत:ला सांभाळून घेत एशियाडमध्ये सहभाग घेतला आणि सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करत पदकही जिंकून दाखवलं.

पिंकी मुळची दिल्लीच्या नेब सराय या भागात राहात असून, गेल्या काही महिन्यांमध्ये तिने कुटुंबातील अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. ज्यामध्ये तिचे आजोबा आणि वडिलांचाही समावेश आहे. कुटुंबावर झालेल्या या आघातातून ती मोठ्या धीराने सावरत तिने हे यश संपादन केलं. ‘तो माझ्यासाठी खूपच कठीण प्रसंग होता. सर्वप्रथम मी माझ्या चुलत भावाला गमावलं. त्यानंतर माझ्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. यातच माझ्या आजोबांचंही निधन झालं. अगदी कमी वेळात या गोष्टी इतक्या पटापट घडत गेल्या की काही कळतच नव्हतं’, असं ती म्हणाली.

VIDEO : फेडररचा ‘तो’ शॉट ठरला यूएस ओपनमधील ‘शॉट ऑफ द टूर्नामेंट’

वडिलांच्या निधनानंतर पिंकीने त्यांच्या अंत्यविधींनंतर एशियाडच्या तयारीला सुरुवात केली. बिकट परिस्थितीमध्ये आणि समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत तिने हे यश संपादन केलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उज्वल केलं.