विश्व क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा दबदबा आहे. सर्वच जण त्याच्या क्रिकेटचे आणि एकूणच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे चाहते आहेत. टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाने आपली उत्कृष्ट फलंदाजी, विक्रम आणि नेतृत्त्व कौशल्याने केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. फक्त क्रिकेट चाहतेच नाही तर जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूही त्याचे चाहते आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने विराट बरोबर त्याच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे आणि विराटला त्याच्या लेकीबरोबर लग्न करण्याबाबतही तो बोलला होता.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्णधार एलिसा हिलीच्या पॉडकास्ट ‘विलो टॉक’ च्या एका भागात कांगारू संघाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी उपस्थिती लावली होती. मार्क टेलर हे ऑस्ट्रेलियाच्या १९९६ सालच्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार होते. या पोडकास्टमध्ये बोलताना त्यांनी एक मोठा मजेदार खुलासा केला.
मार्क टेलर यांनी सांगितलं की विराटने पहिल्याच भेटीत त्यांना विराटचा स्वभाव फार आवडला होता आणि तेव्हाच त्यांनी त्यांच्या लेकीबरोबर लग्न करण्याचा उल्लेख केला होता. या पॉडकास्टमध्ये जेव्हा विराट कोहलीचा उल्लेख करण्यात आला तेव्हा मार्क टेलर म्हणाले की, “मी विराटचा चाहता आहे. मी त्याची मुलाखत घेऊ शकलो हे माझं भाग्य आहे. खूप वर्षांपूर्वी जेव्हा तो पहिल्यांदाच कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता. तेव्हा अॅडलेड ओव्हलवर नाईन नेटवर्कसाठी मी त्याची मुलाखत घेत होतो. आमच्याकडे अर्ध्या तासाचा स्लॉट होता.”
“ती एक मोठी मुलाखत होती, सगळीकडे कॅमेरा वगैरे होते. मुलाखतीच्या दरम्यान २०-२५ मिनिटांनी त्याचा मॅनेजर त्याला बोलवण्यासाठी आला. तेव्हा माझ्याकडे ३-४ प्रश्नांचा संच अजून बाकी होता, पण आम्हाला मुलाखत थांबवावी लागली. विराट तिथे खुर्चीवर बसला होता आणि मॅनेजर म्हणाला, वेळ संपली आहे, आपल्याला आता निघावं लागेल. विराट त्याच्या जागेवरून उठला आणि मी पण त्याचा निरोप घेण्यासाठी पुढे गेलो.”
विराटच्या त्या कृतीबद्दल सांगताना टेलर म्हणाले, “तितक्यात विराटने माझ्याकडे पाहिलं आणि मला विचारलं, मार्क तुमची मुलाखत पूर्ण घेऊन झाली आहे का? मी म्हणालो, नाही अजून बाकी आहे. पण मला माहितीय की तुला जावं लागेल. तितक्यात विराट परत म्हणाला, नाही आपण मुलाखत संपवून जाऊ. मी त्याला लगेच थँक्यू म्हणालो. विराटच्या मॅनेजरला ही थांबवलं. विराट पुन्हा जागेवर बसला, आम्ही मुलाखत पूर्ण केली. त्याने खरंतर मला तो मान दिला. फक्त मलाच नाही तर क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट फॉरमॅटचाही त्याने मान राखला.”
टेलर विराटबद्दल सांगताना पुढे म्हणाले, “त्या मुलाखतीत विराट कसोटी क्रिकेटप्रती असलेल्या त्याच्या प्रेमाबद्दल बोलला. ऑस्ट्रेलियामधील त्या मालिकेसाठी तो सज्ज असल्याचे म्हणाला. ऑस्ट्रेलियामध्ये खेळून ऑस्ट्रेलियाला हरवणं ही मोठी गोष्ट होती. या विराट कोहलीला मी कायम लक्षात ठेवलं आहे. माझी मुलगी जेव्हा १७ वर्षांची होती तेव्हा मी विराटशी तिची ओळख करून दिली होती आणि म्हणालो होतो, तुला आवडला असेल तर तू याच्याशी लग्न करू शकतेस. तेव्हा विराटचं लग्न झालं नव्हतं.” मार्क टेलर यांचा हा व्हीडिओ खूप व्हायरल होत आहे.