ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय किंवा आशिआई देशांतील खेळाडूंना सतत वर्णभेदी टीकेला सामोरे जावे लागते. आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे गाजली आहेत. २०२०-२१ मधील भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानही अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी झालेल्या सिडनी कसोटी दरम्यान, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना प्रेक्षकांनी वर्णद्वेषी शिवीगाळ केली होती. त्याचदरम्यान सिराजच्या वडिलांचेही निधन झाले होते. या सर्व गोष्टींमुळे मानसिकरित्या खचलेला सिराज मैदानात रडू लागला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टीम पेनने याबाबत खुलासा केला आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ही वादग्रस्त कसोटी मालिका २-१ ने जिंकली होती. त्या मालिकेवर ‘बंदों में है दम’ नावाचा माहितीपट तयार करण्यात आला आहे. या माहितीपटामध्ये टीम पेनने त्या मालिकेतील काही आठवणी सांगितल्या आहेत. “आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणाऱ्या क्रिकेट संघांना चांगली वागणूक देतो. मात्र, प्रेक्षकांची वागणूक बघून आणची पुन्हा एकदा नाचक्की झाली,” असे पेन म्हणाला आहे.

हेही वाचा – बूम बूम आफ्रिदीचे भारतीय क्रिकेटबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाला…

ऑस्ट्रेलियन समर्थकांच्या वागणुकीचा निषेध करत टीम पेन सिराज आणि भारतीय संघाच्या समर्थनार्थ मैदानात उभा राहिला होता. “सिराजचा तो पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा होता. अशातच त्याच्या वडिलांचेही निधन झाले होते. जेव्हा मैदानावर प्रेक्षकांनी त्याला वर्णद्वेषी शिवीगाळ केली तेव्हा तो मानसिकरित्या पूर्ण खचला होता. मला अजूनही आठवते की मी सिराजच्या जवळ गेलो होतो. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते,” असे टीम पेनने सांगितले.

हेही वाचा – थोडक्यात वाचला क्रिस्टियानो रोनाल्डो, कोट्यवधी रुपयांच्या गाडीचा झाला चुरा

सिडनी कसोटीदरम्यान मोहम्मद सिराज सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टीका आणि शिवीगाळ केली होती. कर्णधार अजिंक्य रहाणेने पंच पॉल राफेल आणि पॉल विल्सन यांना माहिती दिली. जसप्रीत बुमराहलाही अशीच वागणूक देण्यात आली होती. त्यामुळे सामना काही काळासाठी थांबवण्यात आला होता. पंचांनी रहाणेला त्याच्या संघाला मैदानाबाहेर नेण्याचा आणि प्रकरण संपल्यानंतर परतण्याचा पर्याय दिला होता, पण भारतीय संघ मैदानावरच थांबला. त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी उपद्रवी लोकांना मैदानाबाहेर हाकलून दिले होते.

कर्णधार टीम पेन आणि ऑस्ट्रेलिया संघाने सिराजला पूर्ण पाठिंबा दिला होता. या दौऱ्यात सिराजने दमदार कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर त्याने हैदराबादमध्ये वडिलांना श्रद्धांजली वाहिली होती.