|| अभिजित कुंटे : माजी बुद्धिबळपटू आणि प्रशिक्षक

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, महिला क्रिकेट कर्णधार मिताली राज आणि पदकविजेते ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकपटू अशा एकूण १२ क्रीडापटूंना शनिवारी राष्ट्रपती रामनाथ र्कोंवद यांच्या हस्ते देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनामधील दरबार सभागृहात झालेल्या शानदार समारंभात ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, जागतिक स्पर्धा गाजवणाऱ्या क्रीडापटूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्रातील ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आणि प्रशिक्षक अभिजीत कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने, तर मल्लखांबपटू हिमानी परबला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी व्यक्त केलेले मनोगत-

यंदा ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराचा मानकरी ठरल्याबद्दल खूप आनंद झाला आहे. मागील ३५ वर्षे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून केलेले काम तसेच बुद्धिबळाच्या प्रसारासाठी सामाजिक उपक्रमांत घेतलेल्या सहभागाची दखल घेण्यात आली, याचे समाधान आहे. माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीला जागतिक पातळीवर भारत खूप मागे होता. मात्र, आता जगात आपला देश चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय बुद्धिबळाची प्रगती अशीच पुढे सुरू राहावी, यासाठी कार्यरत राहण्यास हा पुरस्कार मला प्रेरणा देत राहील.

मी अनेक वर्षे बुद्धिबळ खेळलो आणि आता प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून दोन्ही भूमिका खूप आव्हानात्मक आहेत. खेळाडू म्हणून सर्व जबाबदारी ही तुमच्याच खांद्यावर असते. तुमच्या चांगल्या-वाईट कामगिरीला तुम्ही स्वत:च जबाबदार असता. याउलट प्रशिक्षक म्हणून तुम्ही केवळ खेळाडूंना मार्गदर्शन करू शकता. त्यांना योजना आखून देऊ शकता; परंतु त्यानुसार खेळायचे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी खेळाडूचा असतो. त्यामुळे दोन्ही भूमिकांमध्ये बराच फरक असला तरी दोन्ही तितक्याच अवघड आहेत.

मी बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा वयोगटच १६ वर्षांपासून सुरू व्हायचे. मात्र, आता आठ वर्षांखालील वयोगटातील मुलांसाठीही आपल्याकडे बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जातात. भारताकडे बुद्धिबळातील ‘महासत्ता’ म्हणून पाहिले जाते. भारतीय बुद्धिबळ अतिशय वेगाने प्रगती करत असून कनिष्ठ स्तरावरील विविध वयोगटांत भारतीय खेळाडू सातत्याने पदके पटकावत आहेत. नुकतेच ‘फिडे’ ऑनलाइन ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत भारताने कांस्य, तर जागतिक महिला अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली. भारतीय संघाच्या या यशात प्रशिक्षक म्हणून योगदान देता आल्याचे समाधान आहे.

मी १९९७ मध्ये वयाच्या २१व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. या स्पर्धेत भाग घेतलेला मी सर्वात युवा बुद्धिबळपटू होतो. मला त्या वेळी आंतरराष्ट्रीय मास्टर (आयएम) किताबही प्राप्त झाला होता. मात्र, आता आपल्याकडे १४-१५ वर्षांच्या मुलांनीही ग्रँडमास्टर किताब मिळवला आहे. यातूनच भारतीय बुद्धिबळाची किती प्रगती झालेली आहे, याचा प्रत्यय येतो.

भारतीय बुद्धिबळाचे पाऊल पुढे पडत राहावे यासाठी आता राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ अकादमी सुरू करणे आवश्यक आहे. तसेच क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळवली जाते, त्याचप्रमाणे बुद्धिबळाची लीग सुरू करण्याचा विचार झाला पाहिजे, जेणेकरून भारतीय बुद्धिबळपटूंना आपल्यातील प्रतिभा दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल. तसेच आणखी खेळाडू पुढे येतील. या दोन गोष्टी झाल्यास भारताला जागतिक बुद्धिबळात अग्रस्थानी पोहोचण्यात फार वेळ लागणार नाही, याची मला खात्री आहे. भारतीय बुद्धिबळपटूंनी मागील काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी करताना भरघोस यश प्राप्त केले आहे. मात्र, त्यांचा मागील सात-आठ वर्षे अर्जुन पुरस्कारासाठी विचार झालेला नसून यात बदल होणे गरजेचे आहे. या पुरस्काराचे विजेते ठरवण्याच्या गुणपद्धतीत असलेल्या त्रुटी कशा कमी करता येतील किंवा त्यात कोणता बदल करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मला वाटते.

(शब्दांकन : अन्वय सावंत)