भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल अशी ओळख असलेला एमएस धोनी आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटचं मैदान आणि सोशल मीडियापासून दूर असलेल्या एमएस धोनीने रांचीमध्ये आपल्या मित्रांसोबत आपला वाढदिवस साजरा केला आहे. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कुठल्याही स्टार खेळाडूचा वाढदिवस असला की मोठं सेलिब्रेशन होतं. मात्र, धोनीच्या वाढदिवशी असं काही घडत नाही. सोशल मीडियापासून दूर असलेल्या धोनीने अतिशय साधेपणाने आपला वाढदिवस साजरा केला आ. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एमएस धोनी आपल्या मित्रांसह आपला ४४ वा वाढदिवस साजरा करताना दिसून येत आहे.
धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे टेनिसचे प्रशिक्षक आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील उपस्थित होते. धोनी केक कापताना दिसून येत आहे. तर त्याचे मित्र, ‘हॅपी बर्थडे’ गाणं गाताना दिसून येत आहेत. केप कापल्यानंतर धोनीने स्वत: आपल्या हाताने आपल्या मित्रांना केक खाऊ घातला. इतका मोठा खेळाडू, इतक्या साधेपणाने आपला वाढदिवस साजरा करतो, हे पाहून क्रिकेट चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलं आहे. दरम्यान अनेक दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
धोनीच्या वाढदिवस हा ७ जुलैला असतो. पण त्याच्या वाढदिवसाचा जल्लोष हा आठवड्याभरा आधीच सुरु झालेला असतो. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करून ५ वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, त्याचा क्रेझ अजूनही कमी झालेला नाही.
विजयवाडामध्ये धोनीच्या वाढदिवसाचं हटके स्टाईल सेलिब्रेशन करण्यात आलं. धोनीचा मोठा कटआऊट उभारण्यात आला. या कटआऊटसमोर चेन्नई सुपर किंग्ज संघाचे चाहते आपल्या संघाची जर्सी घालून जल्लोष करण्यासाठी आले होते. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.