भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. तरी देखील तो काहीना काही कारणामुळे चर्चेत असतो. आतादेखील धोनी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असलेला धोनी सध्या अवघ्या ४० रुपयांमध्ये उपचार घेत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एमएस धोनी सध्या गुडघेदुखीच्या समस्येने त्रस्त असून त्यावर तो एका खेड्यातील वैद्याकडून उपचार घेत आहे.

विविध माध्यमांनी वृत्तानुसार, गुडघेदुखीच्या समस्येवर उपचार घेण्यासाठी मोठ्या रुग्णालयामध्ये जाण्याऐवजी धोनीने स्थानिक आयुर्वेदिक वैद्याची मदत घेतली आहे. झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेल्या लापुंग या छोट्या गावात धोनी उपचार घेत आहे.

लापुंग गावातील वंदन सिंह खेरवार आपल्या आयुर्वेदिक उपचारांसाठी या प्रदेशात प्रसिद्ध आहेत. वनस्पती, औषधी वनस्पती आणि इतर नैसर्गिक घटकांचा वापर करून ते आपल्या रुग्णांवर उपचार करतात. या उपचारांसाठी ते फक्त ४० रुपये आकारतात. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्येक चार दिवसांनंतर धोनी वंदन सिंह खेरवार यांच्याकडे जात आहे.

हेही वाचा – IND vs ENG Edgbaston Test: विराट कोहलीची साडेसाती सरेना! महत्त्वाच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी

धोनीच्या आई-वडिलांनीदेखील याच वैद्याकडून उपचार घेतल्याचे म्हटले जात आहे. त्यांना गुडघेदुखीच्या समस्येवर आराम मिळाला म्हणूनच धोनीने मोठ्या रुग्णालयामध्ये जाण्याऐवजी वैद्य वंदन सिंह खेरवार यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.