वृत्तसंस्था, बुलावायो : सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे (२४५ चेंडूंत १५३ धावा) याच्यासह मधल्या फळीतील रचिन रवींद्र (१३९ चेंडूंत नाबाद १६५) आणि हेन्री निकोल्स (२४५ चेंडूंत नाबाद १५०) यांच्या तडाखेबंद दीडशतकी खेळीसमोर दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी झिम्बाब्वेचे गोलंदाज हतबल झाले. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा १३० षटकांत ३ बाद ६०१ धावांची मजल मारली होती. न्यूझीलंडची ही झिम्बाब्वेविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली असून पहिल्या डावात त्यांनी ४७६ धावांची मोठी आघाडी मिळवली आहे.
फलंदाजीला अनुकूल खेळपट्टी आणि झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा स्वैर मारा याचा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. सलामीचा फलंदाज कॉन्वेने कसोटी कारकीर्दीतील पाचवे, तर निकोल्सने दहावे शतक साकारले. रवींद्रने कारकीर्दीतील तिसरीच शतकी खेळी केवळ १०४ चेंडूंत झळकावली.
न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांनी दीडशतकी खेळी केल्या, तर झिम्बाब्वेच्या तीन गोलंदाजांनी नकोसा विक्रम करताना शंभरहून अधिक धावा दिल्या. न्यूझीलंडने १ बाद १७४ धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केल्यावर दुसऱ्या दिवशी आक्रमक शैलीत फलंदाजी करताना ४२७ धावांची भर घातली. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा जेकब डफी (३६) हा एकमेव फलंदाज अर्धशतकी खेळीपूर्वी बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
- झिम्बाब्वे (पहिला डाव) : १२५
- न्यूझीलंड (पहिला डाव) : १३० षटकांत ३ बाद ६०१ (रचिन रवींद्र नाबाद १६५, हेन्री निकोल्स नाबाद १५०, डेव्हॉन कॉन्वे १५३, विल यंग ७४; ब्लेसिंग मुझराबानी १/१०१)
३ कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात तीन फलंदाजांनी दीडशतकी खेळी करण्याची ही तिसरी वेळ ठरली. यापूर्वी १९३८ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध, तर १९८६ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी झाली होती.