पॅरिस : तारांकित आघाडीपटू नेयमारने केलेल्या दोन गोलच्या जोरावर पॅरिस सेंट-जर्मेनने फ्रान्समधील लीग-१ फुटबॉलच्या सामन्यात मॉन्टपिएरवर ५-२ अशी सरशी साधली.

क्लेरमोन्ट फूटविरुद्ध सलामीच्या लढतीत एका गोलची नोंद करणाऱ्या नेयमारने दुसऱ्या सामन्यात आणखी दोन गोलची भर घातली. त्याने मॉन्टपिएरविरुद्ध ४३व्या मिनिटाला पेनल्टीच्या साहाय्याने गोल केला. तर उत्तरार्धात त्याने ५१व्या मिनिटाला आणखी एक गोल नोंदवला. त्यापूर्वी ३९व्या मिनिटाला फेलाए साकोकडून झालेल्या स्वयंगोलमुळे सेंट-जर्मेनला आघाडी मिळाली होती. सेंट-जर्मेनचे अन्य दोन गोल किलियान एम्बापे (६९व्या मिनिटाला) आणि रेनाटो सांचेझ (८७व्या मि.) यांनी केले. लिओनेल मेसीला मात्र गोल करता आला नाही.

अन्य लढतींत नॉन्ट आणि लिल, तसेच मोनाको आणि रेन्स यांच्यात १-१ अशी बरोबरी झाली.

प्रीमियर लीग फुटबॉल ; युनायटेडचा लाजिरवाणा पराभव

लंडन : ख्रिस्टियानो रोनाल्डोचा समावेश असलेल्या मँचेस्टर युनायटेड संघाला प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात ब्रेंटफर्डकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. ब्रेंटफर्डने त्यांच्यावर ४-० अशा मोठय़ा फरकाने मात केली.

जॉश डासिल्वा (१०व्या मिनिटाला), मॅथियस जेन्सन (१८व्या मि.), बेन मी (३०व्या मि.) आणि ब्रायन एमबेउमो (३५व्या मि.) यांनी केलेल्या गोलमुळे ब्रेंटफर्डने मध्यंतरालाच ४-० अशी आघाडी मिळवली. उत्तरार्धातही युनायटेडला खेळ उंचावण्यात अपयश आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्य लढतीत, गतविजेत्या मँचेस्टर सिटीने बोर्नमथला ४-० असे पराभूत केले. सिटीकडून इल्काय गुंडोगन (१९व्या मि.), केव्हिन डीब्रूएने (३१व्या मि.), फिल फोडेन (३७व्या मि.) आणि जेफर्सन लेर्मा (७९व्या मि.; स्वयंगोल) यांनी गोल केले.