PM Modi’s Letter To Ashwin On Retirement : भारताचा आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्निनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या मध्यातच अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्याने ब्रिसबनमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी निवृत्त होण्याची घोषणा केली. अश्विनच्या या तडकाफडकी निर्णयाने लाखो क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अश्विनला पत्र लिहित, निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

१४ वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अश्विनने अनेकदा भारताला एकहाती विजय मिळवून दिले आहेत. याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आपली वेगळी छाप सोडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविचंद्रन अश्विनला लिहिलेल्या पत्रात, त्याच्या अविश्वसनिय कारकिर्दीचे कौतुक केले. याचबरोबर अश्विनच्या फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीतील वैविध्याने चकवण्याच्या आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याच्या क्षेमतेचेही कौतुक केले आहे.

सर्वांनाच बोल्ड केले…

प्रिय अश्विन, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तुझ्या घोषणेने भारतातील आणि जगभरातील चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रत्येकजण आणखी अनेक ऑफ-ब्रेकची (ऑफ स्पिन) अपेक्षा करत असताना, तू कॅरम बॉल टाकत सर्वांनाच बोल्ड केले.

प्रत्येक विकेट खास

अश्विनच्या आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील विकेट्सविषयी लिहिताना पंतप्रधान म्हणाले, “तू सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये घेतलेल्या ७६५ आंतरराष्ट्रीय विकेट्सपैकी प्रत्येक विकेट खास होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मालिकाविराचे पुरस्कार जिंकत कसोटी संघाच्या यशात तुझे किती योगदान होते हे दाखवून दिले आहे.”

“कमी वयात कसोटी क्रिकेटच्या पदार्पण केल्यानंतर पहिल्याच सामन्यात पाच बळी पटकावले आणि पुढे २०११ मध्ये विश्वचषक विजेत्या संघात स्थान मिळवले. त्यानंतर २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या अंतिम षटकात भारताला रोमहर्षक विजय मिळवून देत, संघाचा प्रमुख सदस्य झाला. पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासह क्रिकेट विश्वात मोठे नाव केले.”

अश्विनची कसोटी कारकीर्द

रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने ५३७ विकेट पटकावल्या आहेत. अश्विनच्या नावावर ३७ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट आहेत. याचबरोबर त्याने ८ वेळा कसोटी सामन्यात १० विकेट्स मिळवल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर भारतासाठी अश्विनने १५६ एकदिवसीय विकेट्सही घेतल्या आहेत. अश्विनच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये मध्ये ७२ विकेट्स आहेत. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून ७६५ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने फलंदाज म्हणूनही आपली छाप सोडली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ६ शतकांसह ३५०३ धावा आहेत.