विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी यशदायी ठरला. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि पारुपल्ली कश्यप या भारताच्या अव्वल खेळाडूंनी दिमाखदार विजय मिळवत विजयी घोडदौड कायम राखली. युवा खेळाडू सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या चीनच्या वांग यिहानला नमवत खळबळजनक विजयाची नोंद केली. पारुपल्ली कश्यपने क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या हाँगकाँगच्या यून ह्य़ू याला पराभवाचा धक्का दिला. या स्पर्धेत पदकाची प्रबळ दावेदार समजली जाणाऱ्या सायना नेहवालने थायलंडच्या पॉर्नटिप बुरनाप्रासटुस्कविरुद्ध विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
पॉर्नटिपला नमवून सायना उपांत्यपूर्व फेरीत
१८-२१, २१-१६, २१-१४
सलामीच्या लढतीतील विजयाने आत्मविश्वास उंचावलेल्या सायनाने १५व्या मानांकित थायलंडच्या पॉर्नटिप बुरनाप्रासटुस्कवर १८-२१, २१-१६, २१-१४ असा विजय मिळवला. पहिला गेम गमावलेल्या तिसऱ्या मानांकित सायनाने पुढच्या दोन्ही गेम्समध्ये दमदार खेळ करत विजयश्री खेचून आणली. या विजयासह पॉर्नटिपविरुद्धच्या सहाही लढतीत निर्विवाद वर्चस्वाचा विक्रम सायनाने कायम राखला.
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पुढे चाल मिळाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात सायनाने ओल्गा वोल्वानोव्हा हिचा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला होता. या सामन्यात मात्र पॉर्नटिपने पहिल्या गेममध्ये अपेक्षापेक्षा चांगला खेळ करत सायनाला चकित केले. स्मॅशच्या तब्बल ११ फटक्यांचा प्रभावी उपयोग करत पॉर्नटिपने पहिला गेम नावावर केला. मात्र पुढच्या दोन्ही गेम्समध्ये लौकिकाला साजेसा खेळ करत सायनाने यशस्वी पुनरागमन केले. तिसऱ्या गेममध्ये पॉर्नटिपने सायनाचा झंझावात रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. पुढच्या फेरीत सायनाची लढत कोरियाच्या यिआन ज्यू बाअशी होणार आहे.

कश्यपचा यून ह्य़ूला पराभवाचा धक्का
२१-१३, २१-१६
पुरुष गटात भारताचा एकमेव प्रतिनिधी असलेल्या कश्यपने यून ह्य़ूचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ३७ मिनिटांच्या मुकाबल्यात कश्यपने ह्य़ूवर २१-१३, २१-१६ अशी मात केली. ह्य़ुविरुद्धचा कश्यपचा हा पहिलाच विजय आहे.
पहिल्या गेममध्ये कश्यपने १४-७ अशी मोठी आघाडी घेतली. हीच आघाडी वाढवत त्याने पहिला गेम २१-१३ असा नावावर केला. दुसऱ्या गेममध्येही कश्यपने १४-७ अशी आगेकूच केली. मात्र यानंतर ह्य़ूने सलग चार गुणांची कमाई करत पिछाडी भरून काढली. दोघांनीही तोडीस तोड खेळा. ह्य़ूचा खेळ सुरेख होत असल्यामुळे कश्यपला गुण मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. कश्यपपेक्षा सरस खेळ करत ह्य़ूने १५-१५ अशी बरोबरी केली. दुसरा गेम जिंकून ह्य़ू मुकाबला तिसऱ्या सेटमध्ये नेणार, अशी स्थिती असताना कश्यपने दिमाखदार खेळ करत दुसऱ्या गेमसह सामना जिंकला. पुढच्या फेरीत कश्यपला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या पेंग्यू डय़ूशी झुंज द्यावी लागेल.
बलाढय़ वांग यिहानवर पी. व्ही. सिंधूची मात
२१-१८, २३-२१
जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या सिंधूने ५५ मिनिटांत गतविजेत्या आणि लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या वांग यिहानला २१-१८, २३-२१ असे नमवले.  पहिल्या गेममध्ये ८-८ अशी चुरस रंगली असताना सिंधूने १२-९ अशी आघाडी घेतली. परंतु वांगने सहजपणे हार न मानता १६-१६ अशी बरोबरी साधली. त्यानंतर दहाव्या मानांकित सिंधूने सलग दोन गुणांची कमाई केली. ही महत्त्वपूर्ण आघाडी वाढवत सिंधूने पहिला गेम २१-१८ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये अपेक्षेप्रमाणे वांगने सिंधूला टक्कर देत ६-६ अशी बरोबरी केली. पण यानंतर सिंधूने शानदार खेळ करत १३-७ अशी भक्कम आघाडी घेतली. ही आघाडी वाढवत सिंधूने सिंधूने आगेकूच केली. २०-१७ अशा स्थितीत वांगने तीन मॅचपॉइंट्स वाचवले. वांगच्या प्रतिकाराने विचलित न होता सिंधूने मॅचपॉइंट वाचवला आणि त्यानंतर आणखी एक गुण मिळवत दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा मुकाबला चीनच्याच जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असणाऱ्या शिझियान वांगशी होणार आहे.