Chennai Super Kings Trade Deal With Rajasthan Royals: आयपीएल २०२६ स्पर्धेची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसात आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी लिलाव होणार आहे. त्याआधी सर्व संघांना आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. त्याआधी सर्व संघांकडे ट्रेड विंडोचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे दोन संघ खेळाडूंची अदलाबदल करू शकतात. दरम्यान सर्वात चर्चेत असलेला खेळाडू म्हणून राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये संजू सॅमसनबाबत डील होऊ शकते.
माध्यमातील वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्ज संघाला संजू सॅमसन आपल्या संघात हवा आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ ट्रेड करून संजूला आपल्या संघात घेऊ शकतात. पण हा करार पूर्ण करण्यासाठी राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर एक अट ठेवली आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनला सोडण्यास तयार आहे. पण त्यांनी संजूच्या जागी रवींद्र जडेजा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस या २ खेळाडूंची मागणी केली आहे.
रवींद्र जडेजा हा चेन्नई सुपर किंग्ज संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. २०१२ पासून तो या संघाचा भाग आहे. ज्यावेळी चेन्नई सुपर किंग्ज संघावर बंदी घातली गेली होती, त्यावेळी तो गुजरात लायन्स संघाकडून खेळताना दिसला होता. पण जडेजाच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात ही राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना झाली आहे.
डेवाल्ड ब्रेव्हिसची केली मागणी
संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाची साथ सोडणार, या मोबदल्यात राजस्थान रॉयल्सने जडेजासह डेवाल्ड ब्रेव्हिसची मागणी केली आहे. जगभरातील टी -२० क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. गेल्यावर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला आपल्या संघात स्थान दिलं होतं. त्याआधी तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसला होता. पण आगामी हंगामात तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसू शकतो. पण चेन्नई सुपर किंग्ज संघ संजूसाठी रवींद्र जडेजा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस दोघांनाही सोडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
