R. Ashwin Calls Sanju Samson Selfish: राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार संजू सॅमसनने टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 15-सदस्यीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. पॉवर हिटर सॅमसन हा आयसीसी स्पर्धेसाठी भारतीय संघात नामांकित दोन यष्टिरक्षकांपैकी एक आहे. बुधवारी, कर्णधार सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटरमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) वर विजय मिळवला. २००८ च्या चॅम्पियन्सना यंदा सॅमसनच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आयपीएल चषक जिंकण्याची नामी संधी मिळणार आहे. एकीकडे आयपीएलमध्ये हे घवघवीत यश मिळवत असताना संजू सॅमसनची आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी सुद्धा संघात वर्णी लागली आहे. ऋषभ पंतच्या पाठोपाठ संघात यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनला घेणं हा एक महत्त्वाचा बदल येत्या टी २० विश्वचषकात दिसून येईल. विशेष म्हणजे संजूने के एल राहुलला मागे टाकून आपलं स्थान पक्कं केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजू सॅमसनबद्दल नक्की आश्विन काय म्हणाला?

संजू सॅमसनच्या या यशासाठी त्याचे अभिनंदन करताना अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने केलेले विधान हे क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतंय. अश्विनने सर्वात आधी संजूला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुनरागमनासाठी शुभेच्छा दिल्या व त्याचे हे यश पाहून आनंद झाल्याचे सुद्धा सांगितले. याच बरोबर अश्विनने संजूचा खेळाकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन व त्याच्या फायद्याबद्दल सुद्धा भाष्य केलं.

अश्विन म्हणाला की, “संजू यंदा खूप स्वार्थीपणे खेळत आहे. त्याने १६५ धावांची मजल मारली आहे आणि खरं सांगू तर संजू सॅमसनकडून याच पद्धतीच्या खेळाची गरज होती. मी त्याच्यासाठी आनंदी आहे. त्याने भारतीय विश्वचषक संघात स्थान मिळवलं याचा मला अधिक आनंद आहे.”

तुम्हाला माहीतच असेल की, आरआर आणि आरसीबी यांच्यात नुकत्याच झालेल्या सामन्यात सॅमसनने १३ चेंडूत १७ धावा केल्या होत्या. तर या संपूर्ण हंगामात आतपर्यंत त्याने १५ सामन्यांत ५२१ धावा केल्या आहेत. प्रीमियर फलंदाज रियान पराग १५ सामन्यात ५६७ धावांसह रॉयल्ससाठी आघाडीवर आहे. परागने सुद्धा आयपीएल २०२४ प्लेऑफमध्ये आरसीबीविरुद्ध २६ चेंडूत ३६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

हे ही वाचा<< VIDEO : मॅक्सवेलने हात आपटला, तर विराट फोन घेऊन…; RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये पराभवानंतर घडलं तरी काय?

अश्विनने संजूसह रियानचे सुद्धा कौतुक केले. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना अश्विन म्हणाला की, “रियान परागकडून माझ्या अपेक्षा खूप जास्त आहेत. एक अत्यंत चांगली गोष्ट जी माझ्या लक्षात येते ती म्हणजे हे खेळाडू उत्तम पद्धतीने तयार झाले आहेत त्यांच्या भविष्यातील खेळांसाठी मी तरी खूपच उत्सुक आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravichandran ashwin calls sanju samson selfish after rr captain selected for t20 world cup praises riyan parag after rcb vs rr highlights svs
First published on: 24-05-2024 at 13:30 IST