भारताच्या इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातील विक्रमी पुनरागमनात रवींद्र जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने कर्णधार शुबमन गिलबरोबर २०३ धावांची भागीदारी रचली. जडेजाने स्वतः ८९ धावांची खेळी करत माघारी परतला. अवघ्या काही धावांसाठी जडेजाचं शतक हुकलं. पण जडेजाने दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच बीसीसीआयच्या नव्या नियमाचं उल्लंघन केलं. पण जडेजाने कोणता नियम तोडला आणि यामागचं कारण काय होतं, याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे.
भारताच्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध दौऱ्यानंतर संघामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. कसोटी क्रिकेट आणि भविष्याचा विचार करता अनेक नवे नियम, खेळाडूंमध्ये बदल पाहायला मिळाले. या दौऱ्यानंतरच भारताच्या दिग्गज खेळाडूंनी म्हणजेच विराट कोहली, रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारताला ३-१ असा पराभव पत्करावा लागला होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, बीसीसीआयने एक नवीन नियमावली तयारी केली होती. त्यानुसार सर्व खेळाडूंना टीम बसमध्ये एकत्र स्टेडियममध्ये येण्याजाण्याबाबत पण नियम आहे. परंतु एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, जडेजा टीम बसमध्ये आला नाही, तो त्या आधीच तिथे पोहोचला होता. इंग्लंडमधील आव्हानात्मक खेळपट्ट्यांसाठी आवश्यक तयारी म्हणून तो लवकर पोहोचला होता. पण हा नियम तोडण्यासाठी जडेजाला शिक्षा होणार नसल्याचही म्हटलं जात आहे.
जडेजाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितलं, “मला कुठेतरी असं वाटतं होतं की मी जास्त फलंदाजी केली पाहिजे, कारण चेंडू अजूनही नवीन होता. जर मी नवीन चेंडू खेळून काढला तर पुढील डावासाठी गोष्टी सोप्या होतील. नशिबाने मी लंचपर्यंत फलंदाजी करू शकलो आणि वॉशिंग्टनही शुबमनबरोबर चांगली भागीदारी रचू शकला. इंग्लंडमध्ये तुम्ही कधीच मैदानावर सेट झालात असं म्हणू शकत नाही. चेंडू कधीही स्विंग होऊ शकतो आणि बॅटचा किनारा लागून बाद होऊ शकता.”
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर संघासाठी १० नवे नियम तयार केले आहेत. त्यातील एक म्हणजे खेळाडू आता पर्सनल स्टाफ आणि सिक्युरिटीसह प्रवास करू शकत नाहीत. यात पूर्ण वेळ कुटुंब संघाबरोबर राहू शकत नाही, हा नियमही आहे. खेळाडू किती सामान आपल्याबरोबर आणणार याबाबतही नियम तयार केला आहे. सराव सत्रात उपस्थित राहणंही अनिवार्य केलं आहे. हे नियम संघाच्या शिस्तीसाठी तयार केले आहेत.