भारतीय क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा आज रविवार, ८ जून रोजी लखनऊच्या हॉटेल द सेंट्रम येथे होणार आहे. या सोहळ्याला ३०० हून अधिक पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान त्यांच्या साखरपुड्यापूर्वी फोटोशूट करतानाचा फोटो, व्हीडिओ समोर आला आहे.
साखरपुडा सोहळा लखनऊच्या पंचतारांकित हॉटेल द सेंट्रम येथे होणार आहे. दोन्ही कुटुंब लखनऊला पोहोचली आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी थांबली होती. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान अनेक क्रिकेटपटू देखील या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. रिंकू सिंग आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. तर प्रिया सरोज समाजवादी पक्षाची मच्छलीशहर येथील खासदार आहे. त्यांचा विवाह १८ नोव्हेंबर रोजी वाराणसीमध्ये होणार आहे.
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्यापूर्वीच्या फोटोशूटचे काही व्हीडिओ फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये खासदार प्रिया सरोज हिने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला आहे तर रिंकूने शेरवानी परिधान केला आहे. याशिवाय राजकारणातील अनेक चेहरेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत. त्यांनीही सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. याशिवाय बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रिंकू आणि प्रिया सरोज यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्यासाठी खास जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर सेंट्रम हॉटेलमध्ये सुरक्षा व्यवस्थाही कडक आहे. समाजवादी पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते या सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत. तर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही उपस्थिती दर्शवली आहे. रिंकूच्या साखरपुड्याचे अनेक फोटो, व्हीडिओ समोर आले आहेत.