Rishabh Pant Six Broke Stadium Roof Video: भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंडमध्ये सराव करत आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघ लंडनमध्ये पोहोचला आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भारतासाठी ही कसोटी मालिका महत्त्वाची असणार आहे.

शुबमन गिलला संघाचे कर्णधारपद दिले आहे, तर ऋषभ पंत हा उपकर्णधार असणार आहे. इंग्लंडमधील सरावाचे अनेक फोटो, व्हीडिओ शेअर केले जात आहे. दरम्यान ऋषभ पंतचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये फलंदाजी करताना त्याने लगावलेल्या षटकाराने स्टेडियममधील एका भागाचे छप्पर तुटले आहे.

भारताच्या सराव सत्रादरम्यान, पंतने स्फोटक फलंदाजी करत फिरकीविरूद्ध काही मोठे फटके खेळले. पंतला फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत होता. पंतने त्याच्या गोलंदाजीवर एक दणदणीत षटकार खेचला, जो स्टेडियमच्या छतावर पडला आणि छताच्या काही भागाचे नुकसान झाले.

पंतला भारताचा नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. इंग्लंडमधील गेल्या मालिकेतील कामगिरीमुळे आगामी हंगामात संघाच्या यशासाठी त्याचा फॉर्म अत्यंत महत्त्वाचा ठरेल. इंग्लंडमधील १७ डावांमध्ये त्याने ३२.७० च्या सरासरीने ५५६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतकं आणि २ अर्धशतकं आहेत.

नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये ऋषभ पंत खराब फॉर्मातून जात होता. त्याने १३ डावांमध्ये २४.४५ च्या सरासरीने फक्त २६९ धावा केल्या ज्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. पहिल्या १२ डावांमध्ये अपयशी ठरल्यानंतर पंतला आरसीबी विरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यात सूर गवसला आणि त्याने या सामन्यात शतकी कामगिरी केली.

पंतने ६१ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांसह ११८ धावांचा शानदार खेळी केली आणि लखनौ सुपर जायंट्सला ३ बाद २२७ च्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. पण लखनौचा संघ मात्र जिंकू शकला नाही. जितेश शर्माने ८५* (३३) धावांची उल्लेखनीय खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खराब फॉर्मातून सुरूवात केली असली तरी पंतने शेवट मात्र चांगला केला. त्याचा हा फॉर्म इंग्लंड मालिकेत महत्त्वपूर्ण असणार आहे. २०२२ मध्ये भारताने इंग्लंडमध्ये खेळलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात पंतने शतक झळकावत संघाचा डाव सावरला होता.