पीटीआय, नवी दिल्ली

यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर तंदुरुस्त झाला असून दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या लाल चेंडूंच्या मालिकेसाठी ‘भारत’ अ संघाचे तो नेतृत्व करताना दिसेल. पंतला जुलैमध्ये मँचेस्टर येथे चौथ्या कसोटीत फलंदाजी करताना पायाला दुखापत झाली होती. यामुळे त्याला आशिया चषक आणि नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांत त्याला सहभागी होता आले नव्हते.

ख्रिस वोक्सचा चेंडू हा पंतच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला लागला. मात्र, तरीही तो फलंदाजी करण्यास उतरला आणि त्याने अर्धशतक झळकावले. निवड समितीने त्याला ३० ऑक्टोबरपासून बंगळूरु येथे होणाऱ्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी भारत ‘अ’ संघात स्थान मिळाले. यामुळे पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथे सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तयारी करण्याची संधी मिळेल.

साई सुदर्शनला या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी उपकर्णधाराची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, यष्टिरक्षक ध्रुव जुरेल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनाही संघात घेण्यात आले आहे. हे सर्व खेळाडू विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात सहभागी होते. प्रसिध, सिराज, आकाश दीप व जुरेल ६ ते ९ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात खेळतील. पहिल्या सामन्यासाठी एन. जगदीशन दुसरा यष्टिरक्षक असेल. यासह स्थानिक खेळाडू गुरनूर बरार आणि खलील अहमद यांच्याकडे विशेष लक्ष असेल. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचे नेतृत्व मार्केस एकरमन करेल. टेम्बा बव्हुमाचा या सामन्यांमध्ये सहभाग नसेल. दक्षिण आफ्रिकेचा ‘अ’ संघ १३ ते १९ नोव्हेंबरदरम्यान राजकोट येथे भारत ‘अ’ संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळेल.

पहिल्या सामन्यासाठी भारत ‘अ’ संघ : ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), आयुष म्हात्रे, एन जगदीशन (यष्टिरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर बरार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, आयुष बडोनी, सारांश जैन.

दुसऱ्या सामन्यासाठी भारत ‘अ’ संघ : ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), केएल राहुल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर बरार, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप.