IND vs NZ Fan Angry on Rohit Sharma Virat Kohli: भारतीय संघाच्या न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यातील पराभवामुळे चाहते प्रचंड संतापले आहेत. भारताचे दोन्ही दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा फलंदाजीत सपशेल फ्लॉप झाले. रोहित शर्मा फार काळ मैदानावर टिकू शकला नाही, तर कोहलीही मिचेल सँटनरविरुद्ध अपयशी ठरला. या दोन्ही खेळाडूंची बॅट शांत असल्याने संघाला याचा मोठा फटका बसला. टीम इंडियाच्या या दोन सर्वात अनुभवी फलंदाजांच्या चाहत्यांनी आता त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी रोहित-कोहलीला थेट प्रश्न केला आहे की ते आंतरराष्ट्रीय सामन्यांपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सराव का करत नाहीत.
न्यूझीलंडविरूद्धच्या आधी बेंगळुरू आणि नंतर पुणे दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, दोन्ही स्टार फलंदाजांनी चाहत्यांची निराशा केली. पुणे कसोटीच्या पहिल्या डावात रोहितला खातेही उघडता आले नाही. तर दुसऱ्या डावात हिटमॅन केवळ ८ धावा करून बाद झाला. कोहली बॅटही शांत होती. कोहली पहिल्या डावात केवळ एक धाव करून बाद झाला. कसाबसा का होईना विराट दुसऱ्या डावात १७ धावा करण्यात यशस्वी ठरला.
हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…
सलग दोन सामन्यात फ्लॉप झाल्यानंतर चाहत्यांनी कोहली-रोहितवर जोरदार टीका केली. या दोन दिग्गज फलंदाजांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याबाबत चाहत्यांनी थेट प्रश्न विचारला आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की, ”क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर वयाच्या ४०व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये खेळू शकतो, तर रोहित-कोहली का नाही?’
रोहित-विराटला अनेक माजी खेळाडूंनीही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. इतकंच नव्हे तर या मोठ्या कसोटी मोसमापूर्वी भारतीय कसोटी संघातील बरेच खेळाडू विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत होते. तर जेव्हा जेव्हा खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभागी होत नाहीत, तेव्हा देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसतात. बीसीसीआयने देखील हा नियम सर्वांसाठी केला आहे.
हेही वाचा – वाईड बॉलवर फलंदाज कसा बाद होतो? काय आहे ICC चा ‘तो’ नियम? ज्यावरून धोनीच्या बायकोने घातलेली हुज्जत
देशांतर्गत क्रिकेटमध्ये रोहित-विराट अखेरचे कधी खेळले होते?
विराट कोहली आणि रोहित शर्मा देशांतर्गत क्रिकेट खेळून बराच काळ लोटला आहे. कोहलीने शेवटचा रणजी सामना २०१२ मध्ये खेळला होता. तर सचिन तेंडुलकरने शेवटचा रणजी सामना २०१३ मध्ये खेळला होता. म्हणजे सचिनच्या निवृत्तीपूर्वी भारताच्या या प्रसिद्ध देशांतर्गत स्पर्धेत कोहली शेवटचा दिसला होता. दुसरीकडे, रोहित शर्मा शेवटचा देशांतर्गत क्रिकेटमधील सामना २०१६ मध्ये खेळला होता. कोहलीला देशांतर्गत क्रिकेट खेळून १२ वर्षे झाली आहेत, तर भारतीय कर्णधारही ८ वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट खेळलेला नाही.