सचिन तेंडुलकरने नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) सीझनमधून त्याची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. विशेष बाब म्हणजे सचिन तेंडुलकरच्या या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही स्थान मिळालेले नाही. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टीम इंडियात निवड न झालेल्या भारतीयाला सचिनने त्याच्या या संघाचा सलामीवीर बनवले आहे. या हंगामातील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारेच आपण प्लेइंग इलेव्हनची निवड केल्याचे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.

सचिन तेंडुलकरने म्हटले आहे की, ‘याचा खेळाडूंच्या प्रतिष्ठेशी किंवा त्यांच्या मागील कामगिरीशी काहीही संबंध नाही. या हंगामातील त्यांची कामगिरी आणि या हंगामात ते काय साध्य करू शकले यावर ते पूर्णपणे आधारित आहे.” सचिन तेंडुलकरने हार्दिक पंड्याला त्याच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनचा कर्णधार म्हणून निवडले आहे.

PHOTOS : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची IPL 2022 मधील ‘बेस्ट प्लेइंग इलेव्हन’ तुम्हाला माहीत आहे का?

याचबरोबर सचिनने जोस बटलर आणि शिखर धवन यांना सलामीवीर म्हणून निवडले आहे. कारण त्याला सलामीच्या जोडीत एक डावखुरा फलंदाज देखील हवा होता. जोस बटलर ऑरेंज कॅप विजेता आहे. त्याने आयपीएल २०२२ मध्ये ४ शतकांसह ८६३ धावा केल्या. तर शिखर धवनने १४ सामन्यात ४६० धावा केल्या आहेत.

सचिन धवनबद्दल म्हणाला की, “तो उत्कृष्टरित्या धावांचा वेग वाढवतो आणि स्ट्राइक रोटेट करत राहतो. डावखुरा फलंदाज नेहमीच कामी येतो आणि शिखरचा अनुभवही कामी येईल.” त्याने सांगितले की, “जोस बटलरला पहिली पसंती होती. या आयपीएलमध्ये मला त्याच्यापेक्षा जबरदस्त खेळाडू दिसत नाही. जेव्हा बटलर पुढे येतो तेव्हा बरेच जण त्याला रोखू शकत नाहीत.”

अशी आहे सचिन तेंडुलकरची IPL 2022 XI –

जोस बटलर, शिखर धवन, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, दिनेश कार्तिक, रशीद खान, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.