Heinrich Klaasen Retirement: दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हेनरिकने ऑक्टोबर २०१९ मध्ये रांची येथे भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तब्बल ४ वर्षांनंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने घेतलेल्या तडकाफडकी निर्णयाने आफ्रिकन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

हेनरिक क्लासेनने सोशल मीडियाच्या माध्यमातून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. एक पोस्ट करत त्याने लिहिले, “मी अजूनही तोच आहे, त्याच नावाने खेळत आहे. फक्त एक वेगळी मानसिकता आणि एक नवीन फॉरमॅटमध्ये खेळणार आहे. मी योग्य निर्णय घेत आहे की नाही या विचारात काही रात्री झोपू शकलेलो नाही. खूप विचारांती मी कसोटी क्रिकेट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा घेतलेला एक कठीण निर्णय आहे कारण, माझ्या आतापर्यंतचा क्रिकेट खेळाचा आवडता फॉरमॅट आहे.”

माझा प्रवास अद्भुत होता, नवीन आव्हानासाठी सज्ज आहे हेनरिक क्लासेन

क्लासेनने पुढे लिहिले आहे की, “मैदानावर आणि मैदानाबाहेर मी ज्या लढायांचा सामना केला त्यामुळे मी आजचा क्रिकेटर बनलो आहे. हा एक चांगला प्रवास आहे आणि मला आनंद आहे की मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकलो. माझी बॅगी टेस्ट कॅप ही मला मिळालेली सर्वात मौल्यवान कॅप आहे. माझ्या कसोटी कारकीर्दीत ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि आज मी जो क्रिकेटपटू आहे त्या घडवणाऱ्या सर्वांचे आभार. सध्या एक नवीन आव्हान वाट पाहत आहे आणि ते आव्हान पार पाडण्यासाठी मी सज्ज आहे.”

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या आगामी कसोटी मालिकांच्या योजनांमध्ये क्लासेनचा सहभाग नव्हता असे नाही. वृत्तानुसार, या वर्षी वेस्ट इंडिज आणि बांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी त्याच्या नावाची चर्चा होण्याची अपेक्षा होती, परंतु आता त्याने या शर्यतीतून स्वतःला पूर्णपणे बाजूला केले आहे. त्याच्या या अचानक घेतलेल्या निवृत्तीमुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला आहे. ३२ वर्षीय खेळाडूने आफ्रिकेसाठी चार कसोटी सामने खेळले होते, त्यातील शेवटचा सामना गेल्या वर्षी मार्चमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. त्याची कसोटी कारकीर्द फार मोठी नव्हती आणि तो दक्षिण आफ्रिकेसाठी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये अधिक खेळला आहे. त्याने ४ कसोटी सामन्यात ८ डावात १०४ धावा केल्या.

हेही वाचा: IND vs ENG Test Series: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी, सूर्यकुमार इंग्लंड कसोटी मालिकेतून बाहेर पडू शकतो; जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्लासेनची एकदिवसीय आणि टी२० मधील कामगिरी:

हेनरिक क्लासेनच्या एकदिवसीय आणि टी-२०च्या कामगिरीबद्दल जर सांगायचे झाले तर, सध्या तो दक्षिण आफ्रिकन संघाचा महत्त्वाचा भाग आहे. क्लासेन आफ्रिकेकडून आतापर्यंत एकूण ५४ एकदिवसीय आणि ४३ टी-२० सामने खेळला आहे. या कालावधीत, त्याने ५० एकदिवसीय डावांमध्ये ४०.०७च्या सरासरीने १७२३ धावा आणि ३९ टी-२० डावांमध्ये २२.५६च्या सरासरीने ७२२ धावा केल्या. क्लासेनच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार शतके आणि सहा अर्धशतके आहेत आणि टी-२०मध्ये चार अर्धशतके आहेत.