जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धा २०२३-२५ चा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये होणार आहे. येत्या ११ जूनपासून फायनल क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख जाणाऱ्या लॉर्ड्सच्या क्रिकेटच्या मैदानावर खेळवला जाईल. हा अंतिम सामना ११ ते १५ जूनपर्यंत खेळवला जाणार आहे. याशिवाय काही कारणास्तव कसोटी सामन्याचा एखादा दिवस वाया गेल्यास त्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. या दोन्ही संघांमधील हा अंतिम सामना तटस्थ ठिकाणी खेळवला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी वेगळ्या वातावरणात खेळणं ही पहिली परीक्षा असणार आहे. पण यापूर्वी दोन्ही संघांमध्ये तटस्थ ठिकाणी कधी सामना खेळवला गेला होता, जाणून घेऊया.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये तब्बल ११३ वर्षांपूर्वी न्यूट्रल व्हेन्यू म्हणजेच तटस्थ ठिकाणी सामना खेळवला गेला होता. १९१२ साली हे दोन्ही संघ अखेरचे तटस्थ ठिकाणी एकमेकांविरूद्ध खेळले होते. त्यामुळे या दोन्ही संघातील सर्व खेळाडू पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी एकमेकांविरूद्ध भिडणार आहेत. ११३ वर्षांपूर्वी तिरंगी मालिकेत तीन संघ भिडले होते. ज्यामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा समावेश होता. या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, या पराभवाचा बदला घेण्यासाठी आफ्रिकेचा संघ सज्ज झाला आहे.

दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात न्यूट्रल ठिकाणी अखेरचा सामना कधी झाला होता?

१९१२ मध्ये, ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड, लॉर्ड्स आणि ट्रेंट ब्रिज येथे तीन कसोटी सामने खेळले होते. हे तिन्ही सामने इंग्लंडसह झालेल्या तिरंगी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होते. ही स्पर्धा १९०९ मध्ये तत्कालीन इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्सच्या पहिल्या बैठकीत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१९१२ मध्ये झालेल्या या मालिकेला फार कमी यश मिळाले होते. १९१२ मध्ये इंग्लंडमध्ये उन्हाळा असूनही पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी या मालिकेकडे पाठ फिरवली आणि मालिका आर्थिकदृष्ट्या अपयशी ठरली. “ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना ब्रिटिश जनतेला फारसं आकर्षित करणारा नव्हता,” असे डेली टेलिग्राफने वृत्त दिले.

दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात मॅनचेस्टरमध्ये झालेला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने ८८ धावा आणि एका डावाने जिंकला. या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून चार्ल्स केलेवे आणि वॉरन ब्राडसले यांनी शतकी खेळी केल्या होत्या. तर आफ्रिकेडून सिड पेगलेरने ६ विकेट तर रेजी स्क्वार्ट्झने ३ विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ ९५ धावांवर सर्वबाद झाला होता.

ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने १० विकेट्सने सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स केलेवे आणि वॉरन बार्डस्ले यांनी शतकं झळकावली. आफ्रिकेडून सिड पेगलेरने ४ विकेट तर डेव नॉर्स यांनी ३ विकेट्स घेतल्या होत्या.

या दोन्ही संघांमधील तिसरा सामना ड्रॉ झाला. या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी चांगली संघाच्या धावसंख्येत योगदान दिलं. तर सिड पेगलेरने ४ तर ऑब्रे फॉकनरने ३ विकेट्स घेतल्या होत्या. दोन्ही संघांमध्ये या मालिकेत ३ सामने खेळवले गेले. यातील दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले तर एक सामना ड्रॉ झाला. आफ्रिकेच्या सिड पेगलेरने संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

११३ वर्षांनंतर आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आता तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिका आयसीसी ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका जिंकत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणार का, यावर सर्वांच्या नजरा आहेत.