Wankhede Stadium, MCA Museum: एक काळ असा होता जेव्हा भारतीय कसोटी संघात स्थान पटकावणं शक्य होतं पण मुंबईच्या संघात स्थान मिळवणं कठीण- अशा शब्दात मुंबई क्रिकेटचं वर्णन केलं जात असे. भारतीय क्रिकेटची नर्सरी म्हणजे मुंबई असं मानलं जात असे. मुंबईनेच खडूसपणाची शिकवण देत असंख्य कसोटीपटू घडवले. मुंबईनेच भारतीय संघाला सुनील गावस्करांसारखा तंत्रशुद्धतेचा वस्तुपाठ असलेला फलंदाज दिला. याच मुंबईने सर्वसमावेशक खेळाची अनुभूती असलेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर दिला. वानखेडेवर मैदानावरच महेंद्रसिंग धोनीने नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचत वर्ल्डकपच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. याच मुंबईत टी२० वर्ल्डकपविजेत्या संघाचं अभूतपूर्व स्वागत झालं. ‘मुंबईचा राजा’ ही बिरुदावली रोहित शर्माला मिळवून दिली. मुंबई आणि क्रिकेट हे एक अनोखं गुळपीठ आहे. मुंबईकरांच्या धमन्यांमध्ये क्रिकेट वसलंय म्हटलं तर वावगं ठरू नये. मुंबई क्रिकेटचा इतिहास उलगडणारं, वारसा जपणारं संग्रहालय वानखेडे स्टेडियममध्ये उभं राहिलं आहे.

देशभरातून आणि अगदी परदेशातूनही पर्यटक मुंबई दर्शनासाठी येत असतात. मुंबई दर्शनात गेट वे ऑफ इंडिया, मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर आणि मरिन ड्राईव्हसारखी ठिकाणं दाखवली जातात. पण इथून पुढे मुंबई दर्शनात आणखी एका ऐतिहासिक ठिकाणाची भर पडणार आहे. पर्यटकांना आणि क्रिकेट चाहत्यांना एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयासह संपूर्ण वानखेडे स्टेडियम देखील जवळून पाहता येणार आहे. संपूर्ण वानखेडे स्टेडियम आणि एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालय पाहण्यासाठी फक्त तुम्हाला ४५० रूपये मोजावे लागणार आहेत. तर फक्त क्रिकेट संग्रहालय पाहायचं असेल, तर त्यासाठी ३०० रूपयांचं तिकीट खरेदी करावं लागेल. आता क्रिकेट संग्रहालयात तुम्हाला काय काय पाहायला मिळेल? हे जाणून घ्या.

एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे उद्घाटन २३ ऑगस्ट रोजी राज्यसभा सदस्य शरद पवार आणि भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता १९ ऑक्टोबरपासून हे संग्रहालय सर्व सामान्य लोकांना पाहण्यासाठी खुलं करण्यात आलं आहे. जर तुम्ही अस्सल क्रिकेट चाहते असाल, तर तुम्हाला इथे येऊन खूप काही शिकायला मिळणार आहे. क्रिकेटमध्ये कोणते आणि किती प्रकारचे चेंडू वापरले जातात? क्रिकेट सुरू झालं तेव्हा पहिली बॅट कशी होती आणि आता किती बदल झाला आहे. लिटील मास्टर पासून ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान वापरलेल्या सर्व वस्तू इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. हे सर्व तुम्हाला या संग्रहालयात पाहायला मिळणार आहे.

दीड तासात तुम्हाला काय काय पाहायला मिळणार?

वानखेडे स्टेडियममध्ये गेट नंबर २ मध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालय आहे.संग्रहालयाच्या आत प्रवेश करण्यापूर्वीच डाव्या बाजूला लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या आयकॉनिक पुतळा आहे. तर उजव्या बाजूला शरद पवार यांचा पुतळा आहे. हे संग्रहालय मुंबई आणि भारतीय क्रिकेटच्या महान वारसाला समर्पित आहे. इथे क्रिकेटचा इतिहास, मुंबईतील महान खेळाडू आणि एमसीएच्या योगदानाचा प्रवास मांडलेला आहे.

क्रिकेटची उत्क्रांती

क्रिकेटची सुरूवात १७ व्या शतकापासून झाली, त्यावेळी वेगळ्या पद्धतीच्या बॅटचा वापर केला जायचा. तेव्हापासून ते मॉर्डन डे क्रिकेटमध्ये बॅटची लांबी, रूंदी, आकार आणि वजन कसं कमी झालं? हे तुम्हाला पाहायला मिळेल.

रणजी करडंक गॅलरी
मुंबई रणजी संघाने आतापर्यंत ४२ वेळा रणजी स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. या सर्व जेतेपदं तुम्हाला इथे या गॅलरीत पाहायला मिळेल.

दिग्गज खेळाडूंनी परिधान केलेले ब्लेझर
मुंबईतील दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत परिधान केलेले भारताचे ब्लेझर इथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहेत. हे तुम्हाला अगदी जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.

रोहितची जर्सी अन् बॅट
रोहित शर्माने आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेदरम्यान जी जर्सी परिधान केली होती आणि या स्पर्धेत जी बॅट वापरली होती. ती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे.

सुनील गावसकरांची लकी कॅप
लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना दादर युनियन क्रिकेट क्लबची कॅप परिधान केली होती. या सामन्यात भारताने विजय मिळवला होती. ४४ वर्षांपूर्वीची ही कॅप देखील तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे.

वर्ल्डकप २०११ विजयाच्या आठवणी
वानखेडे स्टेडियम भारताच्या ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार आहे. या स्टेडियममध्ये भारताने २८ वर्षांनंतर जेतेपदाचा वर्ल्डकप जिंकला होता. दरम्यान या सामन्यातील ११ खेळाडूंचे ऑटोग्राफ आणि स्कोअरशिट देखील तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे.

त्रिमूर्ती

हा विभाग तीन मुंबईकर क्रिकेटपटूंना समर्पित आहे ज्यांनी भारताचे १०० हून अधिक कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.

सुनील गावसकर, ‘द लिटल मास्टर’

दिलीप वेंगसरकर, ‘द लॉर्ड ऑफ लॉर्ड्स’

सचिन तेंडुलकर, ‘द मास्टर ब्लास्टर’

वॉल ऑफ फेम

या विभागात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईचे प्रतिनिधित्व केलेल्या सर्व खेळाडूंचा सन्मान केला आहे. ज्यात रोहित सुनील गावसकर, रवी शास्त्रीपासून ते अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

ड्रेसिंग रूम

वानखेडे स्टेडियममधील हुबेहूब ड्रेसिंग रूम तुम्हाला या संग्रहालयात प्रत्नक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे.

इंडिया कॅप्टन्स’ वॉल
मुंबईतून आलेल्या ज्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर भारताचे नेतृत्व केले, त्यांचा गौरव या भिंतीवर करण्यात आला आहे.

वर्ल्ड कप क्युलमिनेट

भारतीय संघाने वानखेडे स्टेडियमवर २८ वर्षांची प्रतिक्षा संपवून वनडे वर्ल्डकप जिंकला होता. इथे तुम्हाला वर्ल्डकप ट्रॉफीचा रेप्लिका पाहायला मिळणार आहे.

द एच डी कांगा लायब्ररी
जर तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडत असतील, तर क्रिकेट संबंधित जितकी पुस्तकं आहेत, ती तुम्हाला इथे वाचायला मिळतील. या लायब्ररीमध्ये तुम्हाला ई- बुक्सची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.