Steven Smith Retires from ODI Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सेमी फायनलच्या भारताविरूद्धच्या लढतीत पराभवाचे पडसाद उमटू लागले आहेत. ऑस्ट्रेलियाचा आधारस्तंभ आणि माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी कसोटी आणि टी२० प्रकारात खेळत राहीन असं स्मिथने सूचित केलं आहे.

भारताविरूद्धच्या पराभवानंतर स्मिथने या प्रकारातून निवृत्त होत असल्याचं सहकाऱ्यांना सांगितलं. नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतग्रस्त असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी ३५ वर्षीय स्मिथकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. स्मिथच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे तो २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचा भाग नसेल हेही स्पष्ट झालं आहे.

‘एकदिवसीय कारकि‍र्दीचा मी पुरेपूर आनंद लुटला. या वाटचालीत अनेक समाधान आणि आनंद देणाऱ्या आठवणी आहेत. दोन विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होणं अभिमानास्पद क्षण आहे. संघ म्हणून प्रत्येक क्षण जगलो आहे. २०२७ विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने मी बाजूला होण्याचा निर्णय घेतला जेणेकरून नव्या दमाचे खेळाडू तयार होऊ शकतील. कसोटी क्रिकेट हे माझ्यासाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. त्यानंतर अॅशेस मालिकाही आहे’, असं स्मिथने सांगितलं.

१७० एकदिवसीय सामन्यात स्मिथने ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करताना ४३.२८च्या सरासरीने ५८०० धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतकं आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय प्रकारात स्मिथच्या नावावर २८ विकेट्सही आहेत. २०१० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मेलबर्न इथे झालेल्या लढतीत स्मिथने एकदिवसीय पदार्पण केलं होतं. भारताविरूद्धच्या सेमी फायनलच्या लढतीत स्मिथ अतिशय सुरेख लयीत खेळत होता. तो शतकी खेळी साकारणार अशी चिन्हं होती. मात्र मोहम्मद शमीने लावलेल्या सापळ्यात स्मिथ फसला. त्याने ७३ धावांची खेळी केली. स्मिथ बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ कमकुवत झाला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची दोन जेतेपदं नावावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक आयसीसी चषक जिंकण्याची संधी होती पण हे स्वप्न भारतीय संघाने धुळीस मिळवलं.